Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

डाव्यांनी पुढाकार घेतल्यास भाजपाची काँग्रेससारखी परिस्थिती होईल - प्रकाश आंबेडकर


लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना काँग्रेस पर्याय ठरू शकत नाही -
मुंबई । प्रतिनिधी -लोकसभेच्या निवडणूका २०१९ ला घेता २०१८ च्या शेवटी घेतल्या जातील. या २०१८ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना काँग्रेस पर्याय ठरू शकत नाही. मोदींना शह देण्याची डाव्यांना मोठी संधी आहे. डाव्यांनी पुढाकार घेतल्यास जी परिस्थिती काँग्रेसची झाली तीच परिस्थिती भाजपाची होऊ शकते. भाजपाला काँग्रेस पर्याय ठरू शकते हे मी मान्य करू शकत नाही, मात्र २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपाला पर्याय ठरू शकते. कर्नाटक राज्याच्या निवडणूका महत्वाच्या आहेत. कर्नाटक जिंकेल त्याचीच देशात सत्ता असेल. यामुळे दोन राज्याच्या निवडणुकीबरोबर लोकसभा निवडणूक घेतली जाईल असे संकेत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात आंबेडकर बोलत होते.

यावेळी बोलताना, राजकारणात विश्वासर्था असावी लागते. हि विश्वासर्था २००३ नंतर निर्माण झाली. अटल बिहारी वाजपेयी त्यातील शेवटचा दुवा होते. वाजपेयी यांच्यामध्ये पक्षाच्या विरोधात सत्य मांडण्याची ताकद होती. आता सध्याच्या राजकारणात ही विश्वासर्था दिसत नाही. राजकारण्यांकडे विकासाचा आराखडा नाही. नवीन पिढी संधी शोधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना आरक्षणाचे कारण देऊन नाकारात्मकतेकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या नव्या पिढीतील तरुणांशी आम्ही सतत संवाद साधत होतो या संवादांमुळेच भिमा कोरेगांव प्रकरणानंतर दंगल घडवण्याची काही लोकांची इच्छा होती असूनही दंगल घडली नाही असे आंबेडकर म्हणाले.

भीमा कोरेगांव प्रकरणानंतर आयोजित बंदला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या बंदमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाल्याने त्याला नक्षलवादाचे नाव दिले जात आहे. आजच्या विद्यार्थ्यांना हिंसा मान्य नसून लोकशाही मान्य आहे. अशा विद्यार्थ्यांना पकडून पोलीस मोठी चूक करत आहेत. हिंसा मान्य नसलेल्या विद्यार्थ्यांना हिंसक बनवण्याचे काम पोलीस आणि सरकारकडून सुरु असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. बंद दरम्यान जे झाले त्यावर बोलले जाते मात्र १ जानेवारीला जे घडले त्याबाबत काहीच चर्चा केली जात नसल्याची खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली. सरकारने १ जानेवारीच्या प्रकाराला जबाबदार लोकांवर वेळीच कारवाई केली असती तर लोकांना रस्त्यावर उतरण्याची गरजच पडली नसती असे आंबेडकर यांनी सांगितले.

विद्यार्थी १० वी पर्यंत शिकूच नये म्हणून शासनाने १४ वर्षापर्यंत सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा केला. यात बदल करून विद्यार्थ्यांना चॉईस ऑफ एज्युकेशन देण्याची गरज आहे. आजच्या तरुण पिढीची मैत्री जाती पलीकडची असल्याने जातीवर आधारित राजकारणाला आता थारा राहिला नाही असे आंबेडकर म्हणाले. विद्यार्थ्यांना चॉईस ऑफ एज्युकेशन दिल्यास आणि आमचा अजेंडा मान्य केल्यास जातीवर आधारित राजकारण करण्याची कोणालाही गरज भासणार नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. देशभरात सध्या राजकारण्यात परिस्थिती हाताळण्याची ताकद नाही यामुळे डावे, गांधीवादी, आंबेडकरवादी आणि धार्मिकवादी सर्वांनाच संधी आहे. राजकारण्यात परिस्थिती हाताळण्याची ताकद निर्माण झाल्यास डावे, गांधीवादी, आंबेडकरवादी आणि धार्मिकवादी एकत्र नांदू शकतात असे आंबेडकर यांनी सांगितले.

२२ जानेवारीला भूमिका जाहीर करणार - भीमा कोरेगांव प्रकरणी अद्याप ३ हजार लोकांना अटक केली. त्यापैकी १०० लोक सोडल्यास सर्वाना जामिनावर सोडून देण्यात आले आहे. मात्र भीमा कोरेगांव प्रकरणी एकबोटे व भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यांना सरकार अटक करेल अशी मला अपेक्षा आहे. एकबोटे व भिडे यांना अटक न झाल्यास २२ तारखेला दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदे परिषदेत पुढील भूमिका जाहीर करू.
- प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom