Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईत ९१३ ठिकाणी तोडक कारवाई, ५५ आस्थापना सील


मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल परिसरात पबला लागलेल्या आगीनंतर पालिकेने मुंबईमधील बेकायदेशीर बांधकामे आणि अग्निसुरक्षेची काळजी न घेणाऱ्या आस्थापनाविरोधात कारवाई सुरु केली आहे. यानुसार ३० डिसेंबर २०१७ पासून महापालिका क्षेत्रातील उपहारगृहे, आस्थापना यांची प्रामुख्याने अग्निसुरक्षा विषयक दृष्टीकोनातून तपासणी करण्यात येत आहे. यानुसार आजवर २ हजार ५६८ आस्थापनांची संयुक्तपणे तपासणी करण्यात आली आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आलेल्या ५५ आस्थापना 'सील' करण्यात आल्या आहेत. तर अनधिकृत बांधकाम आढळून आलेल्या ९१३ आस्थापनांमध्ये तोडक कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ७१८ आस्थापनांना तपासणी अहवाल (Inspection Report) देऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने करवून घेण्याबाबत बजावण्यात आले आहे. तसेच ३० डिसेंबर २०१७ पासून करण्यात येत असलेल्या या कारवाई दरम्यान १ हजार ४१० सिलिंडर्स जप्त करण्यात आले असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे.

मुंबईतील उपहारगृहांच्या तपासणी मोहिमेदरम्यान आज ३९७ उपहारगृहांची, आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आलेल्या ८ उपहारगृहे, आस्थापना यांच्यावर अग्निसुरक्षा विषयक कायद्यातील कलम ८ नुसार 'सील' करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 'एच पश्चिम' विभागात ४, 'बी' व 'जी दक्षिण विभागातील प्रत्येकी २; याप्रमाणे एकूण ८ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. या मोहिमेदरम्यान ५२ ठिकाणी आढळून आलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ तोडण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त २७१ उपहारगृहांना तपासणी अहवाल (Inspection Report) देऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने करवून घेण्याबाबत बजावण्यात आले आहे. तसेच १९७ गॅस सिलिंडर्स देखील या तपासणी मोहीमेदरम्यान जप्त करण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उपहारगृहांमधील अनियमिततांची तपासणी करण्याचे काम महापालिकेने व्यापक स्तरावर सुरु केले आहे. या अंतर्गत सर्व २४ विभागांमध्ये मिळून ५२ चमूंद्वारे ही तपासणी सुरु आहे. या प्रत्येक चमूमध्ये मुंबई अग्निशमन दल, सार्वजनिक आरोग्य खाते आणि इमारत व कारखाने खाते या तिन्ही खात्यांमधील प्रत्येकी एक अधिकारी व आवश्यकतेनुसार संबंधित कर्मचारी यांचा समावेश आहे. या तपासणी दरम्यान उपहारगृहातील अग्निसुरक्षा विषयक बाबी नियमांनुसार असल्याची तपासणी अग्निशमन दलाद्वारे तर आरोग्य विषयक बाबींची तपासणी सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिका-यांद्वारे करण्यात येते. तसेच इमारतीमधील बांधकाम विषयक बाबी, प्रवेशद्वार, मोकळी जागा इत्यादींची तपासणी इमारत व कारखाने या खात्यातील अधिकारी, कर्मचा-यांद्वारे करण्यात येत आहे. आज करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान 'जी दक्षिण' विभागातील 'फूड लिंक रेस्टॉरंट'नावाची २ उपहारगृहे; 'एच पश्चिम' विभागातील लजीज, वॉण्टन, जाफरान व मार्क्स ऍण्ड स्पेन्सर्स या ४ आस्थापना; तर 'बी' विभागातील आजवा स्वीट व हादीया स्वीट; याप्रमाणे एकूण ८ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom