Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

नगरसेवकांच्या विरोधानंतरही यांत्रिक झाडूचा प्रस्ताव मंजूर


मुंबई | प्रतिनिधी - मुंबईतील रस्त्यांकडेची सफाई यांत्रिकी झाडूमुळे योग्य रित्या होत नाही. रस्त्यांकडेची सफाई मनुष्यबळाद्वारे करावी, अशी मागणी स्थायी समितीत करत यांत्रिकी झाडूने रस्त्यांची सफाई करण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. स्थायी समितीत नगरसेवकांनी विरोध करूनही समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रस्ताव मंजूर केला.

मुंबईमधील छोट्या- मोठ्या रस्त्यांवर असंख्य खड्डे पडलेले असताना शहर आणि पश्चिम उपनगरांमधील काही रस्त्यांची यांत्रिकी झाडूच्या साहाय्याने साफसफाई करण्याचा अट्टहास पालिका प्रशासन करीत आहे. यापूर्वी घेतलेले यांत्रिकी झाडू पालिकेच्या सफाई कामगारांच्या चौक्यांबाहेर नादुरुस्त अवस्थेत धूळ खात पडले आहेत. या यांत्रिकी झाडूच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने आता पुन्हा यांत्रिकीझाडूद्वारे साफसफाई करण्याचा घाट घातला आहे. एलबीएस द्रुतगती महामार्गाच्या (पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्ग) साफसफाईसाठी मे. राम इंजीनियरिंग एण्ड कन्स्ट्रक्शन कंपनी, मे. भूमिका ट्रान्सपोर्ट - मे. एम. इ. इन्फ्रा- प्रोजेक्टम प्रा. लि कंत्राटदाराची निवड केली आहे. १३ कोटी ३३ लाख ९३ हजार २७५.३८ रुपयांचे कंत्राट या कंत्राटदारा दिले आहे. याबाबतचा मुदतवाढीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने बुधवारी स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला. या प्रस्तावावर नगरसेवकांनी हरकत घेत विरोध दर्शविला. यंत्राद्वारे व्यवस्थित सफाई कामे होत नाहीत. रस्त्याच्याकडेला वाहने उभी असल्याने सफाई करण्यास अडचणी येतात. परिणामी घाणीचे साम्राज्य तर काही ठिकाणी कचऱ्यांचे ढिग दिसून येतात. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते. महापालिकेने यांत्रिक साफसफाई करण्याऐवजी मनुष्यबळाचा वापर करावा. यापूर्वी लोक घराबाहेर पडण्याअगोदर सफाईकामे होत होती. मात्र, सध्यस्थितीला हे चित्र बदलले आहे. त्यामुळे पालिकेने यांत्रिकी झाडूद्वारे कामे देताना भविष्यात विचार करावा, पूल व जमिनीवरील स्वच्छतेबाबत धोरण काय, असा प्रश्न सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थितीत केला. यावर पाच वर्षासाठी कंत्राट दिल्याचे सांगून तीनवेळा निविदा मागविण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी समितीत स्पष्ट केले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom