पालिकेच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतिगृहातील "एनआयसीयू"चे काम रखडले


मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे प्रभादेवी येथे प्रसूतिगृह आहे. या प्रसूतिगृहात सिद्धिविनायक ट्रस्टच्या आर्थिक मदतीतून नवजात बालकांसाठी एनआयसीयू कक्ष उभारला जाणार होता. पालिका प्रशासनाने विविध कारणे देत या कक्षाच्या कामात दिरंगाई केली आहे. त्यामुळे हा कक्ष अद्याप उभा राहिला नसल्याचा आरोप सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रसूतिगृहाच्या विकासासाठी विविध संवर्गातील हंगामी पदे सुरु ठेवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. यावर बोलताना विशाखा राऊत यांनी प्रभादेवी येथील पालिका प्रसूतिगृहात एनआयसीयू कक्ष उभारणीबाबत होत असलेल्या दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना प्रभादेवी महापालिका प्रसूतिगृहात दररोज अनेक महिला रुग्ण येतात. या प्रसूतिगृहात नवजात बालकांची प्रकृती बिघडल्यास त्याला तत्काळ उपचार मिळावेत व त्याचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी प्रसूतिगृहात 'एनआयसीयू' कक्ष असणे आवश्यक आहे, मात्र त्याची व्यवस्था या प्रसूतिगृहात नसल्याने सदर नवजात बालकांना उपचारासाठी परेल येथील वाडिया रुग्णालयात न्यावे लागते. या प्रसूतिगृहातच एनआयएसयू कक्ष सुरु करण्यासाठी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे आर्थिक मदत देण्यास तयार आहे. सिद्धिविनायक ट्रस्टचे पदाधिकारी आणि पालिका अधिकारी यांची बैठकीही झाली. मात्र कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. पालिकेचे अधिकारी एनओसी मिळत नाही, सीआरझेडची अडचण आहे, अशी विविध कारणे देत एनआयसीयूच्या कामात खोडा घालत असल्याचा आरोप विशाखा राऊत यांनी केला. सिद्धिविनायक ट्रस्ट हे एनआयसीयू कक्ष उभारून देण्यासाठी आर्थिक मदत देण्यास स्वतः हुन तयार आहे परंतु पालिका प्रशासनच मदत घेण्यात कमी पडत आहे, अशा शब्दात विशाखा राऊत यांनी आपली खंत व्यक्त केली. दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर व काँग्रेसच्या नगरसेविका कमरुद्दीन सिद्दीकी यांनीही आपल्या विभागातील प्रसूतिगृह व रुग्णालयाच्या समस्या स्थायी समितीपुढे मांडल्या.
Previous Post Next Post