नालेसफाईचा गाळ मुंबईच्या डम्पिंगमध्ये - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाईचा गाळ मुंबईच्या डम्पिंगमध्ये

Share This
मुंबई । जेपीएन न्यूज - 
मुंबई महापालिकेत नालेसफाई घोटाळा गाजला होता. या घोटाळ्यानंतर महापालिका प्रशासन आजही नालेसफाईकडे दुर्लक्ष करत असल्याने कंत्राटदारांचे चांगलेच फावले आहे. प्रशासन मेहरबान असल्याने नालेसफाईचा गाळ नियमानुसार मुंबई बाहेर न जाता कांजूरमार्ग येथील डम्पिंगमध्ये टाकला जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

मुंबई महापालिकेत २०१५ मध्ये नालेसफाई घोटाळा उघड झाला होता. काँग्रेसचे नगरसेवक मोहसीन हैदर यांनी नालेसफाईचा गाळ टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांवर जाऊन कंत्राटदारांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे उघड केले. त्यानंतर पालिका आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करत पालिका अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई केली. नालेसफाईमधील घोटाळा उघड झाल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत दक्षता पाळण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतरही गाळ शहराबाहेर जातो कि नाही याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. 

गाळ नेमका कुठे टाकतात ? -
मुंबईमधील डम्पिंग ग्राऊंड कचऱ्याने भरले आहेत. डम्पिंगमध्ये नालेसफाईचा गाळ टाकण्यास जागा नसल्याने कंत्राटदारांनी मुंबईबाहेर डम्पिंगची जागा स्वतः बघून त्या जागेवर गाळ टाकावा असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नालेसफाईचा गाळ मुंबईबाहेरील नवी मुंबईतील उलवे व भिवंडी येथील मानकोली येथे टाकत असल्याचे कंत्राटदार सांगतात. मात्र नालेसफाई सुरु असलेल्या बहुतेक ठिकाणी गाळ वाहून नेण्यासाठी कुठेही गाड्या निदर्शनास आलेल्या नाहीत. यामुळे गाळ काढल्यावर तो मुंबईबाहेर नेमका कसा नेला जातो याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

महापौरांनी केले दुर्लक्ष - 
नालेसफाईची कामे सुरु असताना पूर्व उपनगरातील मुलुंड पर्यंतचा गाळ शहराबाहेर न नेता शहराच्या आत वाहून नेला जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. गाळ वाहून नेणाऱ्या गाड्या शहराबाहेर न जाता शहराच्या आतच फिरत असल्याने या गाड्यांची माहिती काढल्यावर त्या कांजूरमार्ग डम्पिंगच्या आत शिरताना व गाळ खाली करून बाहेर पडताना दिसतात. हा प्रकार पूर्व उपनगरच्या नालेसफाईच्या दौऱ्यावर असलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निदर्शनास आणल्यावर आपण आताच जाऊन डम्पिंगवर गाळ टाकण्याचा प्रकार रोखूया असे त्यांनी सांगितले. नंतरमात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करत त्यांनी मानखुर्द येथील नाल्याच्या पाहणीसाठी आपला ताफा वळवला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages