अभियंत्यांनी वॉर्डांमधील किमान १० टक्के खराब रस्त्यांची पाहणी करावी - विजय सिंघल

JPN NEWS
मुंबई - मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पालिका प्रशासनाला नगरसेवक व राजकीय पक्षांनी धारेवर धरायला सुरुवात केली आहे. नागरिकांनी सोशल मिडियावर पालिकेची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. याची दखल घेत पालिका प्रशासनाला जाग आली आहे. महापालिकेच्या रस्ते विभागाचे कार्यकारी आणि सहाय्यक अभियंत्यांनी त्यांना नेमून दिलेल्या वॉर्डांमधील किमान १० टक्के खराब रस्त्यांची पाहणी करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांनी रस्ते विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

मुंबईतील 'खड्डेयुक्त' रस्ते आणि खराब रस्त्यांविषयी अतिरिक्त आयुक्त सिंघल यांनी संबंधित अभियंत्यांना निर्देश दिले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी फक्त योग्य पॅकिंग असलेल्या 'बॅग्ज' मधून आणलेल्या 'कोल्डमिक्स'चा वापर पावसात करावाकरावा. योग्य पॅकिंग असल्याशिवाय कोणत्याही रस्त्यावर त्याचा वापर करू नये. पाऊस पडत असतानाच फक्त 'कोल्डमिक्स'चा वापर करावा. 'कोल्डमिक्स' आणि वापरलेल्या साहित्याच्या कागदपत्रांचा 'लेखाजोखा' वॉर्डच्या कर्मचाऱ्यांनी ठेवावा. 'खड्ड्याची खोली २५ मिमीपेक्षा जास्त असताना 'कोल्डमिक्स'चे थर उत्पादकांच्या निर्देशानुसार पसरवावेत. अपुऱ्या राहिलेल्या प्रकल्प रस्त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराचीच असून, तो हे काम करतो की नाही, हे 'सेंट्रल एजन्सी'च्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी तपासावे असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.
Tags