मुंबई - राज्यात मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, पुणे, चंद्रपूरपर्यंतच्या महापालिका यांच्या बेजबाबदार आणि असंवेदनशील कारभारामुळे 'रस्त्यात खड्डे' म्हणायच्या ऐवजी 'खड्ड्यात रस्ता' असं म्हणावे लागेल, अशी सर्वत्र परिस्थिती आहे. खड्ड्यात पडून नागरिकांचा मृत्यू होत आहे. उत्तम दर्जाचे रस्ते हा नागरिकांचा अधिकार आहे आणि तो जर त्यांना मिळत नसेल तर याहून तीव्र आंदोलने माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांकडून होतील, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
खड्ड्यात पडून नागरिकांचा मृत्यू होत आहे. महाराष्ट्राचे हे चित्र दुर्दैवी आहे. या प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणे शक्यच नाही. गेले काही दिवस पक्षातर्फे राज्यभर माझ्या महाराष्ट्र सैनिकांची आंदोलने सुरू आहेत. ही आंदोलने लोकांसाठी आहेत. असंवेदनशील सरकारी व्यवस्थेला जागे करण्यासाठी ती सुरू आहेत. आंदोलनांचा हेतू एकच ती या व्यवस्थेला स्वत:ची लाज वाटावी आणि परिस्थती सुधारावी. आमच्या आंदोलनातून महाराष्ट्रातील जनतेचा रोष समोर येत आहे आणि याची काहीशी भीती सरकारला वाटत असावी म्हणून महाराष्ट्र सैनिकांवर खटले दाखल केले जात आहेत, त्यांची धरपकड सुरू आहे. पण मुळातच महाराष्ट्र सैनिक असल्या केसेसना घाबरत नाहीत, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. गेले कित्येक दिवसांपासून विविध आंदोलनांनी महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा मला अभिमान आहे आणि त्यांचे मी अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले..