नायर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी २५ कोटी खर्चून वसतिगृह

JPN NEWS
 
मुंबई - मुंबई महापालिकेच्या नायर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहासह व्यायामशाळा बांधण्यात येणार असून यासाठी पालिका सुमारे २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला सुरुवात होणार आहे.

जी-दक्षिण हाजीअली विभागातील केशवराव खाडे मार्गावरील सीटीएस क्रमांक ४७-६ भूखंडावर नायर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतीगृह इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. सध्या याठिकाणी आरसीसी बांधकाम असलेली तळमजला अधिक एकमजली इमारत असून ती मोडकळीस आल्याने निष्कासीत करण्यात आली आहे. त्यामुळे या जागेवर आता वसतीगृहाकरिता स्टील्ट अधिक ९ मजली इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी व्यायामशाळाही बांधण्यात येणार आहे. या कामासाठी मे किंजल कन्स्ट्रक्शन कंपनीला २५ कोटी ६६ लाख ८५ हजार ८५५ रुपयांचे कंत्राट दिले आहे. दरम्यान , याच भूखंडावर पालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी जिमखाना बांधण्याचा पालिकेने सादर केलेला प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी या जागेवर महापौरांचे निवासस्थान बनवण्यात यावे, अशी सूचना भाजपच्या सदस्यांनी केली होती. परंतु ही सूचना फेटाळत सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाच्या मदतीने सदर प्रस्ताव संमत केला होता. आता याच भूखंडावरील काही भागात वसतिगृह व व्यायामशाळा बांधण्यात येणार असून बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
Tags