Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

लोअर परळ पूल बंद केल्याने नागरिकांचे हाल

मुंबई - कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता नेहमी गर्दी असलेला लोअर परळचा उड्डाण पूल सोमवारपासून बंद करण्यात आला आहे. पूल बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पाच मिनीटांच्या अंतरासाठी प्रवाशांना अर्धातास लागत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. गर्दीमुळे या ठिकाणी एल्फिस्टन पुलासारखी चेंगराचेंगरीची शक्य़ता वर्तवली जाते आहे. त्यामुऴे रेल्वे व पालिकेने समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर दुस-याच दिवशी ग्रॅन्टरोड येथील पुलाला तडे गेल्य़ाचे समोर आले. त्यानंतर घाटकोपर व दादर येथील टिळक पूल व आता लोअर परळचा रोज गजबजलेला असलेला पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. रेल्वे, आयआयटी मुंबई व मुंबई महापालिका यांनी केलेल्या स्ट्क्चरल ऑडिटनंतर लोअरपरळ येथील रेल्वे पूल धोकादायक असून तो तात्काळ बंद करण्याचा आदेश दिला. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेसाठी हा पूल वाहने व पादचा-यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम सोमवारपासून सुरु करण्यात आले आहे. त्यामुऴे काम पूर्ण होईपर्यंत हा पूल बंद ठेवण्यात आला आहे. मात्र कोणतीही पूर्वसूचना व पर्यायी व्यवस्था न करता पूल बंद ठेवल्याने सकाळपासूनच येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊन गोंधऴाचे वातावरण निर्माण झाले होते. लोअर परळ स्थानकातून बाहेर पडण्यासाठी फक्त एक पूल उपलब्ध असून तो अत्यंत लहान आहे. पुलावरून उतरल्यानंतर खाली चिंचोळी गल्ली आहे. शिवाय रस्त्यावर बाईक पार्क करण्यात येत असल्याने बाहेर पडण्यासाठी अर्धातास कसरत करावी लागते आहे. डेलिस पुलाची लांबी 62.72 मीटर असून रुंदी 23.20 मीटर इतकी आहे. पूल बंद करण्यापूर्वी पूर्व सूचना व पर्यायी व्यवस्था केलेली नसल्याने प्रवाशांचा प्रचंड गोंधळ उडाला. सकाळी प्रचंड गर्दी होऊन अनेकांचे हाल झाले. येथे चेंगराचेंगरीची शक्यता वर्तवण्यात येते आहे. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतरही रेल्वे व पालिका प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला नसल्याने प्रवाशांकडून संतापाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

तपासणीनंतर आणखी पाच पुलांची पुनर्बांधणी, दुरुस्ती -
हँकाक पुलाच्या धर्तीवर लोअर परळचा डेलिस पूल तातडीने पाडून त्याच्यासह आणखी पाच उड्डाण पुलांची पुनर्बांधणी करण्याची मागणी पश्चिम रेल्वेने मुंबई महापालिकेकडे केली आहे. यांत ग्रॅन्टरोड येथील फेरेर उड्डा्ण पूल, मुंबई सेंट्रलचा बेलासिस उ्डाणपूल, दादरचा टिळक उड्डाण पूल, प्रभादेवीचा करोल पूल, महालक्ष्मी पूल या पुलांचा समावेश आहे. रेल्वेने अशी मागणी केली असली तरी याबाबतचा निणर्य अद्याप महापालिकेने घेतलेला नसल्याचे समजते. त्यामुळे दुर्घटनेनंतरही रेल्वे - पालिकेमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्रीज बंद करण्याआधी रेल्वे प्रशासनाने पालिकेला कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. त्यामुळेच प्रचंड गर्दीमुळे दुर्घटना होण्याची भीती आहे. त्यामुळे पालिका आणि रेल्वे यांनी समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू आहे.
- यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष

बेस्ट बस मार्गामध्ये बदल --
पूल बंद केल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक अन्य मार्गावरुन वळवण्यात आली आहे. बेस्ट बसेसचेही मार्ग बदलण्यात आले आहेत. आता या मार्गांवरून जाणाऱ्या बेस्ट बसगाड्यांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे . बस क्रमांक २ मर्यादित व ६३ या दोन्ही बसेस बाबला मस्जिदकडून भारतमाता सिनेमा, मडकेबुवा चौक [ परेल ] , एलफिन्स्टन रोड पूल, परळ एसटी आगाराकडून पोतुगीज चर्चकडे वळवण्यात आल्या आहेत. तर ५२ क्रमांकची बस परळ एसटी आगार, एलफिन्स्टन रोड , मडकेबुवा चौक [ परळ] वरुन भारतमाता मार्गे लालबागकडे दोन्ही दिशेने वळवण्यात आल्या आहेत. तर बस क्रमांक ४४, ५०,५७ , १६६ डाऊन मिल कडून यादव चौक, दीपक सिनेमा , धनमील नाका , परळ एस टी आगार , सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड, मडकेबुवा चौक [ परळ ] आंबेडकर मार्गावरुन भारतमाता सिनेमाकडून दोन्ही दिशेला धावणार आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom