
मुंबई - कोकण रेल्वेवरील प्रवाशांना लवकरच एटीव्हीएम, मोबाईल तिकीट सुविधेतूनही अनारक्षित तिकीट मिळणार आहेत. कोकण रेल्वेची अनारक्षित तिकीट यंत्रणा क्रिसशी (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम) जोडली जाणार आहे. परिणामी, तिकिटांशी निगडित अनेक सुविधा मिळणे सोपे जाणार असल्याची माहिती क्रिसकडून देण्यात आली. ग्रामीण भागातील जनतेलाही या सुविधेचा सर्वाधिक फायदा होणार आहे. तसेच याद्वारे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे अनारक्षित तिकीट प्रवासी काढू शकतील. त्यासाठी कोकण रेल्वेचा सर्व्हर क्रिसच्या सीएसएमटी येथे जोडण्यात येईल. त्याचे अनेक फायदे मिळणार असून एटीव्हीएम, मोबाईल तिकीट सुविधाही सुरू करणे शक्य होईल अशी माहिती क्रिसचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली.
सध्या कोकण रेल्वे मार्गावर तिकीट खिडक्यांवर मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटे मिळणारी अनारक्षित तिकीट यंत्रणा उपलब्ध आहे. मात्र, ही यंत्रणा स्वतंत्रपणे कोकण रेल्वेची आहे. त्यासाठी असलेला भारतीय रेल्वे व कोकण रेल्वेचा सर्वर हा पूर्णपणे वेगळा आहे. कोकण रेल्वेचा सर्व्हर हा त्यांच्या बेलापूर येथील मुख्यालयात आहे. या यंत्रणेला जोडून एटीव्हीएम, मोबाईल तिकीट सुविधा प्रवाशांना उपलब्ध करणे शक्य नाही आणि त्याद्वारे अनारक्षित तिकीट देणेही खर्चिक बाब आहे. सध्या रेल्वे प्रशासनाची क्रिस संस्था कार्यरत असून पश्चिम, मध्य रेल्वे विभागाबरोबरच देशभरातील अन्य विभागांमध्येही क्रिसकडून सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्या-त्या रेल्वे विभागातील तिकीट यंत्रणेतील सर्वर हे क्रिसशी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन तिकीट सुविधा उपलब्ध करणे शक्य होत आहे. कोकण रेल्वेच्या अनारक्षित तिकीट यंत्रणेशीही लवकरच क्रिस जोडले जाणार असून त्यासाठी कोकण रेल्वेचा बेलापूरमध्ये असलेला सर्व्हर क्रिसच्या सीएसएमटी येथील मुख्यालयात आणला जाईल. येथूनच कोकण रेल्वेची अनारक्षित तिकीट यंत्रणा हाताळली जाईल. यामुळे कोकण रेल्वे स्थानकांतून प्रवास करणारे प्रवासी किती, महसूल याची तंतोतंत माहितीही मिळण्यास मदत होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोकण रेल्वे स्थानकांमध्ये नसलेली एटीव्हीएम सुविधा, मोबाईल तिकीट यंत्रणाही सुरू करणे शक्य होईल. कोकण रेल्वेची अनारक्षित तिकीट यंत्रणा क्रिसशी जोडली जाणार आहे.