Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मराठा आंदोलनावेळी बेस्टचे ४० लाख रुपयांचे नुकसान

मुंबई - मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन म्हणून बेस्टची ओळख आहे. बेस्ट आर्थिक अडचणीत असताना मराठा आरक्षण आंदोलनाची झळ बेस्टला बसली आहे. या आंदोलनामुळे बेस्टचे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान मानखुर्द येथील मोहिते-पाटील नगर येथे बसमध्ये पेट्रोलच्या बाटल्या टाकून बस जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या दिवसभराच्या आंदोलनात बेस्टच्या १० बसगाड्यांच्या टायर्समधून हवा काढण्यात आली होती, तर १४ बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये बसगाड्यांच्या २७ काचा फुटल्या. तर दिवसभरात ३९.८३ लाखांचा महसूल बुडाला आहे. 

जुलै महिन्यात झालेल्या मराठा आंदोलनामुळे मुंबईतील रेल्वे, एसटी, बेस्टची वाहतूक विस्कळीत झाली होती. कुर्ला आगाराची ५१७ क्रमांकाची बस सांताक्रुझ ते नेरूळ मार्गावर चालविण्यात येत होती. या बसमधील ९ सीट जळल्या होत्या तर काही काचा फोडण्यात आल्या होत्या. या घटनेत कोणीही प्रवासी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली नाही. दिवसभरात शहरात झालेल्या विविध ठिकाणच्या आंदोलनात एकूण २४ बसेसचे नुकसान झाले होते. यामध्ये दोन बसेसना जाळण्याचा प्रयत्न झाला होता, तर बाकीच्या घटनांमध्ये टायरमधील हवा काढण्याच्या आणि काचा फोडण्याच्या घटना घडल्या होत्या. 

बेस्टच्या नुकसान झालेल्या बसगाड्यांचा एकूण खर्च १ लाख ४५ हजार ४८० रुपये एवढा काढण्यात आला आहे. १८ जुलै रोजी बस तिकीट विक्रीपासून प्राप्त झालेल्या रकमेशी तुलना करता बुधवार, २५ जुलै रोजी बस तिकीट विक्रीतून प्राप्त झालेली रक्कम ३९ लाख ८३ हजार रुपयांनी कमी असल्याचे बेस्ट प्रशासनाने बेस्ट समितीला सादर केलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom