दृष्टी जाण्यास जबाबदार डॅाक्टरांवर दिवाणी, फौजदारी खटले

मुंबई - महिनाभरापूर्वी जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर पाच रुग्णांची दृष्टी गमवावी लागली. या गंभीर प्रकरणानंतर रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. याच्या चौकशीनंतर सादर करण्यात आलेल्या अहवालावर पालिका आयुक्त समाधानी नसल्याने या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून येत्या सात दिवसांत अहवाल सादर करावा तसेच संबंधित दोषींवर फौजदारी व दिवाणी खटले दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे पाच रुग्णांना दृष्टी गमावावी लागली. पालिकेच्या आरोग्य खात्याचा ढिसाळ कारभार भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणून देत चौकशीची मागणी केली होती. त्यापूर्वी या प्रकरणाची कुपर रुग्णालयाने चौकशी करून त्याचा अहवाल सादर केला होता. हा अहवालाच्या आधारे सामंत यांनी सदर प्रकरण उघडकीस आणले होते. अहवालात रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षकांसह १० जणांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या चौकशी समितीच्या अहवालानुसार वैद्यकीय अधीक्षक एच. एस. बावा यांची चेंबूर येथील मॅा हॅास्टिपटमध्येमध्ये बदली करण्यात आली. मात्र गंभीर प्रकरण असतानाही या प्रकरणात दोषी असणा-यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे सर्वपक्षीय गटनेत्यांनी या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत पालिका आयुक्तांची भेट घेऊन याबाबत निपक्ष चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन पालिका आयुक्तांनीही या अहवालाबाबत समाधानी नसल्याचे सांगत पुन्हा पालिका अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन व आरोग्य विभागाचे उपायुक्त सुनील धामणे यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता पुन्हा चौकशी केली जाणार असून येत्या सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांने दिले आहेत.
काय आहे प्रकरण --
मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोगेश्वरी येथे बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयात ४ जानेवारी रोजी डोळ्यांमध्ये लेन्स लावण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सात जणांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यापैकी पाच जणांना पूर्ण अंधत्व आले. तर दोन जणांना अंधुक दिसते आहे. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर रोज स्वच्छ करणे अपेक्षित असताना ते केले जात नाही. दोन आठवड्यातून एकदा ऑपरेशन थिएटर स्वच्छ केले जाते. रुग्णालयात झाडू मारण्याचे, शौचालय स्वच्छ करण्याचे तसेच वॉर्डबॉयचे काम एकाच कर्मचाऱ्यांकडून केले जात असल्याने रुग्णांना जंतूसंसर्ग झाल्याचा प्रकार समोर आला.
Tags