मुंबईत मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार – संजय निरुपम


मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये बोगस मतदारांचा सूळसुळाट होणार आहे आणि हे लोकशाहीला अत्यंत धोकादायक आहे. याबाबत निवडणूक आयोगाने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने कडक पावले उचलली पाहिजेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आणि नितीन शिंगाटे यांच्या एकलव्य सॉफ्टवेअरच्या आधारे अशी माहिती समोर आली आहे की एकाच व्यक्तीच्या नावे ११ ते १३ मतदान ओळखपत्र आढळून आलेले आहेत. एखाद्या मतदार संघात एक व्यक्ती परंतु त्याची विविध जाती धर्माची वेगवेगळी नावे, वेगवेगळे पत्ते, वेगवेगळी वयोमर्यादा, वेगवेगळे बूथ नंबर मिळालेले आहेत. उदाहरणार्थ मागठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये जिथे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आहेत तिथे आम्हाला असे सापडले की मतदार ओळखपत्रांमध्ये ८३८ पैकी फक्त १८२ खरे मतदार आहेत तसेच दिंडोशी विधानसभा क्षेत्रामध्ये जिथे शिवसेनेचेच आमदार सुनील प्रभू आहेत तिथे ५५२ पैकी फक्त २९० खरे मतदार सापडले आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी या संबंधित सर्व कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. या पत्रकार परिषदेला एकलव्य सॉफ्टवेअरचे नितीन शिंगोटे, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील, प्रवक्ते अरुण सावंत उपस्थित होते.

संजय निरुपम पुढे म्हणाले की मुंबईमध्ये मतदार यादीमध्ये सुमारे ८ ते ९ लाख बोगस मतदार आहेत आणि मुंबईमध्ये बोगस मतदार माफिया टोळी कार्यरत आहे. मुंबईमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये १५ ते २० हजार आणि लोकसभा क्षेत्रामध्ये १ ते १.५ लाख बोगस मतदारांची नोंद झालेली आहे. हा खूप मोठा बोगस मतदार ओळखपत्रांचा घोटाळा आहे. सुमारे १५ ते २० हजार बोगस मतदार ओळखपत्र अणुशक्ती नगर, मानखुर्द शिवाजी नगर आणि चांदिवली येथे सुद्धा सापडले आहेत. आमची अशी मागणी आहे की निवडणूक आयोग ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मसुदा रोल (Draft Roll) जाहिर करणार आहेत. त्याआधी सर्व बोगस मतदार ओळखपत्र या मतदार यादीतून वगळली पाहिजेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभाग हे सुसज्ज यंत्रणेने तयार नाही आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक सॉफ्टवेअर नाही आहेत, पुरेसे कर्मचारी व अधिकारी वर्ग नाही आहेत. महाराष्ट्र सरकारने या त्रुटी ताबडतोब दूर केल्या पाहिजेत कारण निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत. मुंबईतील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाने बोगस मतदार ओळखपत्रांची समस्या गंभीरपणे घेऊन ताबडतोब कडक पावले उचलली पाहिजेत. त्यांना शोधून त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकली पाहिजेत. माझ्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक अधिकारीच या घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत. पैसे घेऊन हे अधिकारी हे बोगस ओळखपत्रे तयार करून देण्याची कामे करतात.

संजय निरुपम पुढे म्हणाले की या बोगस ओळखपत्रांसहित निवडणूक आयोग ३१ जानेवारी २०१९ ला मसुदा रोल (draft roll) जाहिर करणार आहेत का ? निवडणूक आयोग याबाबत गंभीरपणे विचार करून त्वरित कारवाई करणार आहेत की नाही ? ३१ जानेवारीच्या आधी जिल्हाधिकारी कारवाई करणार आहेत की नाही ? या बोगस ओळख पत्र घोटाळ्यामुळे शेकडो खऱ्या मतदारांना ओळख पत्र मिळणार आहेत की नाही ? असे काही गंभीर प्रश्न येथे उपस्थित होत आहेत, असे संजय निरुपम म्हणाले.
Tags