भारत निवडणूक आयोगाने घेतला निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा

मुंबई - आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने राज्यातील निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांनी आज येथे घेतला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कालपासून निवडणूक आयुक्त लवासा आणि चंद्रा राज्यातील यंत्रणांशी बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेत आहेत. उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण, महासंचालक (व्यय) दिलीप शर्मा तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यावेळी उपस्थित होते. आज आयोगाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेतला.

आयोगाने जिल्हानिहाय मतदान केंद्रावरील पाणी, वीज, शौचालयाची सुविधा,दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हील चेअर आदी सुविधांचा आढावा घेऊन विविध सूचना दिल्या. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम), व्हीव्हीपॅटची उपलब्धता नियमानुसार राहील याची दक्षता घ्यावी. व्हीव्हीपॅट जागृती अभियान नियमितपणे राबवावे. 'सी-व्हिजील' मोबाइल ॲप तसेच '1950' मतदार हेल्पलाईन बाबत जागृती करावी. मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याबाबत आलेल्या प्रत्येक अर्जावर कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीची माहिती डॅशबोर्डवर भरावी,आदी सूचना त्यांनी केल्या.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेषतः गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मतदार जागृतीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. महिला मतदार नोंदणी व मतदान टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. यावर्षी आयोगाने दिव्यांग मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दिव्यांग मतदारांची नोंदणी, तसेच त्यांना मतदान केंद्रावर घेऊन जाणे व परत सोडण्याची व्यवस्था निवडणूक प्रशासनाने करायची आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे, तडीपार प्रकरणे, फरार गुन्हेगार यांच्याबाबत नियमित कारवाई सुरू ठेवावी. अजामीनपात्र वॉरंटचा आढावा घ्यावा. शस्त्र परवान्याचा आढावा घेऊन शस्त्र जमा करून घ्यावेत. अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. सामाजिक सौहार्द अबाधित राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, आदी सूचना केल्या.

आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या निर्देशांकडे लक्ष ठेवून त्यांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. प्रत्येक जिल्ह्यात राजकीय पक्षांशी बैठक घेऊन त्यांच्या सूचना, प्रश्न जाणून घ्यावेत. संवेदनशील मतदान केंद्र निश्चिती काळजीपूर्वक करावी. दूरसंचार सुविधांची उपलब्धता नसलेल्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी आपापल्या जिल्ह्याच्या तयारीबाबत सादरीकरण केले.

लवासा म्हणाले, महाराष्ट्रात यापूर्वी अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही निवडणूकही शांततेत व पारदर्शकपणे व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी नियोजनबद्ध आखणी करावी. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे व दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम करावे. संवेदनशील मतदारसंघात जास्त लक्ष देण्यात यावे. माध्यमांमध्येही अचूक व योग्य माहिती देण्यात यावी. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडे आलेले कुठलाही अर्ज प्रलंबित ठेवू नये. शांततेत, निर्भय वातावरणात निवडणुका होण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावे.

निवडणूक आयुक्त चंद्रा म्हणाले, मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याचे पाणी व इतर सुविधा असाव्यात, याकडे लक्ष द्यावे. व्हीव्हीपॅट, इलेक्ट्रिक मतदान यंत्रणे तसेच मतदानाच्या हक्कासंदर्भात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.