Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

फसवणूकप्रकरणी नायजेरियन जोडप्यासह तिघांना कोठडी


मुंबई  - सुमारे 74 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एका नायजेरियन जोडप्यासह तिघांना सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही येथील लोकल कोर्टाने 22 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आमरा ओबेसोग्यु, ख्रिस्ताबेल लिबेह आणि अशोक बोराडे अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

माहीम परिसरात 57 वर्षांची तक्रारदार महिला राहते. दोन वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यांत तिची डॉनल्ड टॉंड या व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने तो अमेरिकन नागरिक असून मरिन इंजिनिअर असल्याची बतावणी केली होती. डिसेंबर 2017 ते 28 मे 2018 या कालावधीत ते दोघेही मेल, फेसबुक, मोबाईल आणि व्हॉटअपच्या माध्यमातून एकमेकांच्या परिचित होते. या दरम्यान त्याने त्यांचा विश्‍वास संपादन केला होता.

तो काम करीत असलेल्या जहाजातील सोने, चांदी आणि विदेशी चलन असलेले पार्सल भारतीय कस्टम विभागाकडून सोडविण्यासाठी तसेच तिला वीस हजार पाऊंड देण्याचे आमिष दाखवून त्याने त्यांच्याकडून 74 लाख 20 हजार 150 रुपये घेतले होते, ही रक्कम त्यांनी डॉनल्ट याच्या सांगण्यावरुन विविध बँक खात्यात जमा केली होती.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने सोने-चांदी आणि पैशांचे पार्सल तसेच वीस हजार पाऊंड तिच्या घरी पाठविले नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी माहीम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

या गुन्ह्यांचा तपास नंतर सायबर सेल पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. हा तपास हाती येताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. यावेळी पोलिसांना ही रक्कम तीस बॅक खात्यात जमा झाली होती. फसवणुकीच्या उद्देशानेच संबंधित बँक खाती उघडण्यात आली होती, तांत्रिक माहितीवरुन पोलिसांना नवी मुंबईतील न्हावाशेवा, उलवे परिसरातील काही रिक्षा आणि टॅक्सीचालक नायजेरीयन टोळीच्या संपर्कात असल्याचे समजले होते.

या टोळीच्या मदतीने संबंधित फसवणुकीचा गुन्हा झाल्याचे तपासात निष्पन्न होताच पोलिसांनी अशोक बारोडे या रिक्षाचालकाला अटक केली होती. त्याच्या चौकशीत आमरा आणि ख्रिस्ताबेल या पती-पत्नीची नावे समोर आली. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom