शाळा, रुग्णालयाच्या आवारात जंकफूड विकण्यास बंदी - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 March 2019

शाळा, रुग्णालयाच्या आवारात जंकफूड विकण्यास बंदी


मुंबई -- शाळा, रुग्णालयांबाहेर वडापाव, मिसळ, चिप्स याच्यासह १२ पदार्थांना आता पालिकेच्या नवीन फेरीवाला धोरणानुसार  बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतल्या शाळा आणि रुग्णालयाबाहेर आता जंकफूडची विक्री करता येणार नाही. शाळा आणि १०० रुग्णांची क्षमता असणाऱ्या रुग्णालयाबाहेर चणे, शेंगदाणे, फळे आणि नारळ पाणी व्यतिरिक्त कोणतेही खाद्यपदार्थ विकता येणार नसल्याचे या धोरणात म्हटले आहे. 

शाळा आणि रुग्णालयाबाहेर कमी खर्चात मिळणारा नागरिकांचा सर्वात आवडता पदार्थ वडापाव आता दिसणार नाही. जास्त मीठ आणि मैदाचा वापर करून तयार केलेल्या पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयाच्या उपहारगृहातही तळलेल्या पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. आता पालिकेच्या फेरीवाला धोरणानुसार जंकफुडवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळांबाहेर सर्रास विक्री -
महापालिकेने फेरीवाला धोरणाअंतर्गत हे तळलेले पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना शाळा आणि रुग्णालयाच्या १०० मीटर बाहेर बसवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच शाळा आणि रुग्णालयाबाहेरील नजीकच्या अंतरावरील खाऊ गल्ल्या बंद होण्याची शक्यता आहे.  फेरीवाल्यांना आता तळलेले पदार्थ १०० मीटर अंतराच्या आतमध्ये विकता येणार नाहीत. तसेच धार्मिक स्थळांसाठीही या नियमाची अंमलबजावणी केली आहे.  मंदिर परिसरात फक्त प्रार्थनेशी संबंधित वस्तू विकण्याबर बंदी घालण्यात आलेली नाही. तर सरकारी, खासगी कंपन्यांसमोर जंक फूड विकण्यासाठी कंपन्यांच्या कामाच्या वेळेत त्यांना व्यवसाय करता येणार आहे.

Post Bottom Ad