राणीबागेत दोन बिबट्यांचे आगमन

मुंबई - भायखळ्याच्या ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ राणीबागेत पेंग्विन दाखल झाल्यानंतर आता ड्रोगन आणि पिंटो हे दोन बिबटे आणण्यात आले आहेत. हे दोन्ही बिबटे मंगलोरच्या पिलीकुलालू प्राणी संग्रहालयातून आणले आहेत. दोन महिने डॅाक्टरांच्या देखरेखेखाली ठेवले जाणार असून त्यानंतर मुंबईकरांसाठी हो दोन्ही बिबटे पाहण्यासाठी खुले केली जातील. पेंग्विननंतर हे दोन्ही रुबाबदार बिबटे पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे.  

राणीबाग नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मागील दोन वर्षांत राणीबागेचा कायापालट झाला आहे. पेंग्विन पक्ष्याच्या आगमनानंतर राणीबागेतील गर्दी वाढली आहे. आता विविध पक्षी, प्राणी आणून राणीबागेचा लूक बदलण्याचा प्रयत्न प्रशासनाचा सुरू आहे. त्यासाठी प्राणी-पक्ष्यांकरिता पिंजऱ्यांची कामे सुरू आहेत. आता दोन नव्या पाहुण्यांचे आगमन झाल्याने पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. या दोन बिबट्यांपैकी ड्रोगन नर व पिंटो ही मादी अशी त्यांची नावे आहेत. नर हा दोन वर्षाचा तमर मादी ही साडेतीन वर्षाची आहे. रोज साडेतीन किलो बीफ आणि चिकन या दोन्ही बिबट्यांना देण्यात येते. दोन्ही बिबटे आक्रमक असल्याने कर्मचारी व डॅाक्टरांना त्यांच्याजवळ जाताना तसेच हाताळताना काळजी घ्यावी लागते. त्यांना रोजच्या रोज आहार द्यावा लागतो आहे. दरम्यान पर्यटकांना ड्रोगन आणि पिंटो यांना पाहण्यासाठी अजून दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Tags