मुंबई -- जुहूतील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगत असलेली बंगल्यांची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या आवारातील जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेने नोटिस पाठवली आहे. अमिताभ यांचा ‘प्रतीक्षा’ बंगला आणि त्या शेजारील उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या आवारातील आठ-नऊ फूट जागा बाधित होणार आहे. दरम्यान सत्यमूर्ती रेसिडन्सीची जागा लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे तर अमिताभ बच्चन यांना जागा ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
जुहूतल्या एन. एस. रस्ता क्रमांक १० येथून जुहू चंदन चित्रपटगृहाकडून इर्ला उदंचन केंद्राकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर मार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या परिसरात एक शाळा, दोन मॉल आणि दोन चित्रपटगृहे आहेत. त्यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूकीती वर्दळ असते. वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना समस्यांना सामोरे जावे लागते. याचा येथून जाणा-या- येणा-यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष वेधून पालिकेने या मार्गाचे ६० फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेऊन हे कामही जवळपास पूर्णही झाले आहे. संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी जंक्शनवरील के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या सत्यमूर्ती रेसिडन्सी आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याच्या आवारातील काही जागेची आवश्यकता असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यासाठी या दोघांनाही नोटीस पाठविण्यात आली होती. नोटीस मिळताच के. व्ही. सत्यमूर्ती यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयानेही स्थगिती आदेश देण्यास नकार दिल्याने पालिकेने सत्यमूर्ती रेसिडन्सीच्या आवारातील जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांमध्ये या सात मजली इमारतीची संरक्षक भिंत पाडण्याची आणि आवश्यक तेवढी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे समजते.