मुंबई -- वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे आधुनिकीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे राणीबागेचा लूक आता बदलतो आहे. या पार्श्वभूमीवर राणीबागेत नवे पाहुणे दाखल होत आहेत. बिबट्यानंतर कानपूर झुऑलॉजिकल पार्क येथून स्वॅम डीअर (बारसिंगा) यांची जोडी आणण्यात आली आहे. बारसिंगाची ही जोडी शुक्रवारपासून नागरिकांना पाहता येणार आहे.
प्राणी संग्रहालय प्रकल्प महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पाचा प्रथम टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्राणि हस्तांतरण प्रकल्पांतर्गत मिलिटरी मकाव यांची एक जोडी आणि नाईट हेरॉन यांच्या तीन जोड्यांच्या बदल्यात कानपूर झुऑलॉजिकल पार्क यांच्याकडून मागील ८ मार्चला स्वॅम्प डीअरची (बारसिंगा) एक जोडी आणण्यात आली. सदर प्रजाती हरण संवर्गातील असून भारतीय वन्य जीव कायदा १९७२ नुसार अनुसूची एक प्रवर्गात समाविष्ट केली गेली आहे आणि ती भारताच्या मध्य, उत्तर आणि उत्तर-पूर्व भागांमध्ये आढळते. दोन्ही हरणे ही पाच वर्षांची आहेत. (सरासरी आयुष्यमान २३ वर्षे) आणि त्यांच्याकरिता बांधण्यात आलेल्या पिंज-यामध्ये, कृत्रिम तलाव, अन्न पुरवठ्याची खोली आणि विश्रामाकरीता दलदलीचा भाग व छप्पर या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी ३ एप्रिलपासून स्वॅम डीअर (बारसिंगा) यांचा पिंजरा नागरिकांना पाहण्याकरीता खुला करण्यात येत आहे. बारसिंगा प्रदर्शित करणारे महाराष्ट्रातील पहिले प्राणिसंग्रहालय असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.