कोट्यवधीचे प्रस्ताव मंजूर होऊनही रस्ते कामे रखडलेलीच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोट्यवधीचे प्रस्ताव मंजूर होऊनही रस्ते कामे रखडलेलीच

Share This
मुंबई - आचारसंहितेपूर्वी रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव मंजूर होऊनही अद्याप रस्त्यांची कामे सुरु झालेली नाही. तीन महिन्यांपूर्वी रस्त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मंजूर होऊनही कामाची वर्कऑर्डर काढण्यात आली नाही. पाऊस डोक्यावर आला असताना रस्त्यांची कामे कधी होणार असा सवाल विचारत प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात शुक्रवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. 

रस्ते कामांचे प्रस्ताव आचारसंहितेत रखडू नये, यासाठी फेब्रुवारीमध्येच रस्त्यांचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मंजूर केल्यानंतर पुढील सात दिवसांत कामांची वर्क ऑर्डर काढणे आवश्यक होते. मात्र तीन महिने उलटले तरी अद्याप ही वर्क ऑर्डर काढण्यात आलेली नाही. मुंबई व उपनगरांत सद्या रस्त्यांची कशी दयनीय अवस्था झाली आहे, याबाबत शुक्रवारी स्थायी समितीत नगरसेवकांनी पाढाच वाचला. आचारसंहितेपूर्वी प्रस्ताव मंजूर झाले असताना कामे रखडली कशी असा प्रश्न भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांना विचारला. महिनाभरात पावसाळा सुरुवात होईल, त्यापूर्वी कामे पूर्ण होणे अशक्य असल्याने पावसांत रस्त्यांचे काय होणार अशी चिंता नगरसेवकांनी व्यक्त केली. यावर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत, आचारसंहिता शिथील झाल्यावर कामे सुरु केली जातील असे उत्तर प्रशासनाने दिले. मात्र आचारसंहितेपूर्वी कामे मंजूर झाली आहेत, त्यामुळे आचारसंहितेचे कारण पटण्यासारखे नाही, प्रशासनाचा हा हलगर्जीपणा आहे. प्रशासनाने कंत्राटदारांची तळी उचलू नका आम्ही खपवून घेणार नाही, असे म्हणत नगरसेवक अभिजित सामंत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे वाभाडे काढले. रस्त्यांची कामे आचारसंहितेमुळे नाही, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रखडली, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. नगरसेवकांनी विभातील रस्त्यांची कशी दयनीय अवस्था झाली याबाबत पाढा वाचला. अनेक रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, याबाबत नगरसेविका ज्योती अळवणी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्यांच्या कामांकडे झालेले दुर्लक्ष ही वस्तुस्थिती आहे. प्रस्ताव मंजूर झाले असतानाही कामे रखडली कशी? नगरसेवकांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष वेधून तातडीने कार्यवाही सुरू करावी असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages