मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोघांपैकी कोणीही पंतप्रधान होणार नाही. माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे नेते एच.डी. देवेगौडा पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरतील, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित केलेल्या वार्तालापात प्रकाश आंबेडकर बोलत होते.
पवार चर्चेतच राहतील -
भावी पंतप्रधानांबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, भाजपला १४८ ते २०० जागा मिळतील, तर काँग्रेस जेमतेम शंभरी गाठण्यापर्यंत मजल मारेल. त्यामुळे मोदी किंवा राहुल पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत एच.डी. देवेगौडा हे या पदासाठी प्रबळ दावेदार ठरतील. देवेगौडांच्या पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असेल का, अशी विचारणा केली असता त्यांच्याशिवाय अन्य कोणी सर्वसहमतीचा नेता नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी, मायावती आदी प्रादेशिक पक्षांकडे तशी क्षमता आहे. मात्र, त्यांना सर्वांचा पाठिंबा मिंळेल अशी शक्यता नाही. अखिलेश यादव, नवीन पटनायक यांचीही तीच स्थिती आहे. देवेगौडांच्या पाठोपाठ तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे नाव चर्चिले जाईल, असे सांगतानाच शरद पवार १९९१ पासून पंतप्रधानपद मिळण्याच्या चर्चेत आहेत आणि चर्चेतच राहतील, असे ते म्हणाले.
वंचितला दोन जागा मिळतील -
राज्यातील निकालांबाबत सांगताना अनिश्चिततेची स्थिती असल्याचे सांगतानाच वंचित बहुजन आघाडीला राज्यात किमान दोन जागा मिळतील, असा दावा आंबेडकर यांनी केला. निकालानंतर वंचित आघाडी कोणत्या बाजूने जाईल यावर आम्ही भाजपविरोधात बसणार असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले.
नक्षलवादाबाबत निश्चित धोरण आखावे -
गडचिरोली येथील नक्षली हल्ल्याबाबत आंबेडकर म्हणाले, हिंसेने नक्षलवाद संपविता येणार नाही. त्यासाठी निश्चित धोरण आखावे लागेल. नक्षलवाद हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून त्याला सामाजिक-आर्थिक पदर असल्याचे आंबेडकर म्हणाले.