पीडब्ल्यूडीच्या दुर्लक्षामुळे वांद्रेतील नाला गाळात

मुंबई - पावसाळा तोंडावर आला असताना वांद्रे येथील न्यायालयाला लागून असलेला नाला अद्याप गाळाने भरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असून संबंधित नाला बंदीस्त करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे वांद्रे परिसरात पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मुंबईतील नाल्यांची दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सफाई केली जाते. यंदा १ एप्रिलपासून कामाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी ७० टक्के, पावसाळ्यात १५ टक्के आणि पावसाळ्यानंतर १५ टक्के सफाई करण्याचे प्रशासनाचे धोरण आहे. त्यानुसार नालेसफाईची कामे सुरु आहेत. परंतु, पश्चिम उपनगरातील वांद्रे न्यायालय ते खेरवाडीकडे जाणाऱ्या महामार्गाला लागून असलेला नाळा अद्याप गाळात आहे. नाल्यात प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बॉटल, दगड, माती, विटांचा खच पडल्याचे दिसते. मात्र, गाळ काढण्याऐवजी सावर्जनिक बांधकाम विभागाकडून नाला बंदीस्त करण्याचे काम सुरु आहे. वांद्रे परिसराला लागून मिठी नदी वाहते. शिवाय, मोठ्या प्रमाणात येथे लोकवस्ती आणि वर्दळ असते. पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी भरते. त्यामुळे मुंबईकरांचा खोळंबा होतो. न्यायालयाला लागून असलेल्या नाल्या बंदिस्त करण्यात येत आहे. मात्र, त्यातील गाळ काढण्यात न आल्याने मोठा पाऊस झाल्यास विभागाला धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांनी याबाबत प्रभाग समिती अध्यक्ष शेखर वायगंणकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन वायगंणकर यांनी सोमवारी नाल्याची पाहणी केली. दरम्यान, नाला बंदीस्त करण्यासाठी वापरलेले सिमेंट कॉंक्रीट, खासगी संस्थांच्या लटकणाऱ्या विविध वाहिन्यांच्या केबल दिसून आल्या. हा प्रकार गंभीर असून याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा आणि पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची मंगळवारी संयुक्त बैठक बोलावली असून पुन्हा पाहणी करणार असल्याचे ते म्हणाले.
Tags