डॉ. पायलचे जातीवाचक शब्द वापरून रॅगिंग - अहवालाचा निष्कर्ष

Anonymous

मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणात सखोल चौकशी करून त्यासंदर्भातील विस्तृत अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या समितीने गुरुवारी वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाकडे सादर केला असून, डॉ. पायलचे जातीवाचक शब्द वापरून रॅगिंग करण्यात आल्याचा स्पष्ट निर्वाळा त्यात देण्यात आला आहे. सतत होत असलेल्या त्रासामुळे डॉ. पायलचे मनोधैर्य खच्ची झाले, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

डॉ. पायलने आत्महत्या का केली, याची कसून चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने नायर रुग्णालयातील अधिष्ठाता, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, विद्यार्थी तसेच पायलच्या कुटुंबीयांकडे मागील वर्षभरातील घटनाक्रमाबद्दल सखोल चौकशी केली. ५१पेक्षा अधिक जणांचे जबाब त्यांनी या अहवालामध्ये नोंदवले आहेत. नायर रुग्णालयामध्ये ज्या रुग्णांसमोर पायल हिला अपमानास्पद वागणूक मिळाली त्यांचेही म्हणणे चौकशी समितीपुढे मांडण्यात आले आहे. या सगळ्या नोंदींमधून पायल हिला तिघा वरिष्ठ डॉक्टरांकडून त्रास दिला जात होता, हे निष्पन्न झाले आहे.

चौकशी समितीने या प्रकरणाची आठवडाभराहून अधिक काळ दिवसाला दहा ते अकरा तास चौकशी केली. हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे कोणत्याही अंतिम निष्कर्ष काढण्याची घाई करण्यात आली नव्हती. पोलिसांच्या तपासादरम्यान पुढे आलेले निष्कर्ष आणि या समितीने दिलेल्या अहवालातील निष्कर्ष वेगळे असल्यास तपासावर परिणाम होऊ नये यासाठी समितीने सावध पवित्रा घेतला होता. मात्र, गुरुवारी डीएमईआरकडे सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये गुन्हे शाखेने दिलेल्या तपास अहवालाच्या अधीन राहून ही कारवाई करावी, असे चौकशी समितीने सूचित केले आहे.