पावसाळ्यात मुंबई तुंबणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2019

पावसाळ्यात मुंबई तुंबणार


मुंबई - पावसाळ्यापूर्वी ९० टक्के नालेसफाईच्या प्रशासनाच्या दाव्यावर शुक्रवारी स्थायी समितीत जोरदार पडसाद उमटले. मुंबईतील मोठे नाले, रस्त्याच्या लगतच्या मोऱ्यांची अद्याप साफसाफई झालेली नाही. पालिकेकडे सफाईकरिता यंत्रणा नाही. कोट्यवधी रुपये खर्च करुन आलेला रोबोही फेल ठरला आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबई जलमय होईल. त्यामुळे रोबो आणणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थायी समितीत नगरसेवकांनी केली.

दरवर्षी मान्सूनपूर्व ७० टक्के नालेसफाईची कामे केली जातात. कोट्यवधी रुपयांची त्याकरिता तरतूद करण्यात येते. परंतु, पावसाच्या पहिल्या दणक्यातच प्रशासनाचा दावा वाहून जातो. प्रशासनाचा गलथान कारभार याला कारणीभूत आहे. यंदाही मोठ्या नाल्यांची सफाई झालेली नाही. बहुतांश नाले अद्याप गाळ्यात आहेत. रेल्वेला लागून असलेले मोठे नालेही गाळांनी भरले आहेत. विशेष म्हणजे रस्त्यालगत असलेले छोटे नालेही बंदिस्त असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून साफ करणे शक्य होत नाही. बंदिस्त नाले साफ करण्यासाठी पालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा रोबोट खरेदी केला. मात्र बंदिस्त नाले साफ करण्यात रोबोही फेल ठरले आहेत. बंदिस्त नाले साफ करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे कुठलीही यंत्रणा नाही. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे यंदाही मुंबई पाण्याखाली जाईल, असा आरोप समाजवादीचे नगरसेवक पालिका गटनेते रईस शेख यांनी केला. रोबो आणणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर मान्सून दाखल होण्यापूर्वी अगोदरच योग्य प्रकारे नाले सफाईसह बंदिस्त नाले साफ करावेत, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

Post Bottom Ad