Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विमा मिळवून देऊ - मुख्यमंत्री

मुंबई / नांदेड - भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार गेली पाच वर्षे सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. शेतकऱ्यांना पिकविम्याची भरघोस मदत झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात शेतकऱ्यांचे ‘उंबरठा उत्पन्न’ आहे त्यापेक्षा जास्त दाखवले गेल्याने शेतकऱ्यांना यावर्षी विमा मिळाला नाही. पण शेतकऱ्यांनी काळजी करू नये. विमा कंपन्यांच्या माध्यमातून यावर्षी तुम्हाला विमा देण्याचे काम आपले सरकार निश्चितपणे करेल. यापूर्वी तीन वर्षे शेतकऱ्यांना विमा मिळाला असून चौथ्या वर्षी नक्की मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यात लोहा येथे दिली.

महाजनादेश यात्रेदरम्यान आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, यात्राप्रमुख भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. सुधाकर शृंगारे, आ. तुषार राठोड, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. रामपाटील रातोळीकर व विभागीय संघटनमंत्री भाऊराव देशमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाच वर्षात आपल्या सरकारने सर्व समस्या संपविल्या असा आपला दावा नाही मात्र आपण एक दावा निश्चितपणे करतो की, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने पंधरा वर्षात जे काम केले त्याच्या दुप्पट काम आपल्या सरकारने पाच वर्षांत केले. आपले सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या राजवटीत शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपये मिळाले म्हणजे वर्षाला 1200 कोटी रुपये तर भाजपा महायुती सरकारच्या पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटी रुपये म्हणजे वर्षाला दहा हजार कोटी रुपये मिळाले. देशातील सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी योजना आपल्या सरकारने केली. शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत ती चालूच राहील. दुष्काळ, अवर्षण, अतिवृष्टी, बोंडआळी अशा सर्व बाबतीत सातत्याने सरकारने मदत केली.

मराठवाड्याने किती वर्ष दुष्काळ सहन करायचा, असा सवाल करून ते म्हणाले की, आपल्या सरकारने मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा निर्धार केला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीड ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी 64,000 किलोमीटरची पाईपलाईन मराठवाडा वॉटरग्रीड तयार करत आहोत. त्यासाठीचे काम सुरू झाले आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर मराठवाड्यातील प्रत्येक गावात आणि शहरात पिण्यासाठी फिल्टरचे पाणी मिळेल आणि मराठवाड्यातून टँकर कायमचे हद्दपार होतील. त्यासोबत मराठवाड्यात सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी कोकणात समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी योजना आखली आहे. मराठवाड्याच्या हिश्याचे 102 टीएमसी पाणी अडविण्यासाठी धरणे बांधली पण नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे, पावसाचे वेळापत्रक बदलल्यामुळे आणि अन्य कारणांनी हे पाणी अडवले जात नाही. मराठवाड्याच्या हिश्याचे सर्व पाणी वापरले जावे, यासाठीही सरकारने योजना आखली आहे. येत्या काळात मराठवाड्याला दुष्काळाची झळ कधीच पोहचणार नाही, असा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे.

त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत आपल्या सरकारने सर्व क्षेत्रात महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य बनविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बलशाली भारत निर्माण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेचे कलम 370 रद्द केल्यामुळे जम्मू – काश्मीर आता भारताचा अविभाज्य अंग झाले आहे. बलशाली भारताच्या अंतर्गत आपल्याला मजबूत आणि समृद्ध महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. त्यासाठी जनादेश द्यावा.

खा. प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, या मतदारसंघातील जनता समाधानी असून मुख्यमंत्र्यांवर खुष आहे. आम्ही विकासासाठी जे मागितले ते देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आजपर्यंत कोणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे पाच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहून जनतेचा आशिर्वाद घ्यायला पुन्हा आले नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीला मत द्यायचे आहे. हे काम सर्व जिल्ह्यातील सर्व नऊ मतदारसंघात करून नांदेड जिल्हा मराठवाड्यात भाजपाचा बालेकिल्ला करायचा आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom