Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

भगवती रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारा


मुंबई : मुंबई महापालिकेची तसेच सरकारी रुग्णालये शहरात आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरात एकही मोठे रुग्णालय नसल्याने येथील नागरिकांना शहरातील मोठ्या रुग्णालयात धाव घ्यावी लागते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने पश्चिम उपनगरात भगवती रुग्णालयाच्या नूतनीकरणावेळी सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवावे, अशी मागणी पालिकेच्या विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुंबईत ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. ट्रॅफिक आणि उपनगरातून शहरातील रुग्णालयांकडे जाण्यासाठी लागणारे अंतर पाहता मोठ्या रुग्णालयात पोहचण्याआधीच अनेकांचा जीव जातो. यामुळे उपनगरात सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारल्यास अनेक रुग्णांना याचा फायदा होणार आहे. पालिकेच्या भगवती रुग्णालयाची पुनर्बांधणी केली जात आहे. या रुग्णालयाची पुनर्बांधणी करताना सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारावे, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. भगवती रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारल्यास त्याचा फायदा विरार ते पालघरमधील नागरिकांना होणार असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिकेची केईएम, नायर, सायन ही मोठी रुग्णालये आहेत. ही तीनही रुग्णालये शहर विभागात आहेत. गरीबांवर मोफत आणि इतरांवर स्वस्त उपाचार केले जात असल्याने या तीनही रुग्णालयात मुंबईसह राज्यातील तसेच देशभरातील रुग्णांची प्रचंड गर्दी असते. महापालिकेची पूर्व आणि पश्चिम उपनगरात छोटी रुग्णालये आहेत. मात्र, या रुग्णालयांमध्ये योग्य अशा सोयी सुविधा तसेच डॉक्टर नसल्याने शहरातील मोठ्या रुग्णालयात जावे लागते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom