महापौरांविरोधात मनसे आक्रमक

JPN NEWS

मुंबई - सांताक्रुझ येथील माय-लेकाचा शॅाक लागून झालेल्या मृत्यूनंतर निषेध करणाऱ्या महिलांचा अवमान करणाऱ्या तसेच त्यांना धमकी देणाऱ्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी मनसेने केली आहे. सांताक्रूझ पटेल नगरमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एका महिलेचा हात पिरगळल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापौर बंगल्यावर धडक दिली. 

सांताक्रुझ येथील महिलेशी असभ्य वर्तन मुंबई महानगरपालिकेला काळीमा फासणारी आहे. मुंबईचे प्रथम नागरिक असलेले महापौरच जर असे वर्तन करत असतील, तर निश्चितच उभ्या मुंबईसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. म्हणूनच, मुंबई आणि महानगरपालिकेची प्रतिमा सुधारण्यासाठी महापौरांनी वर्तनात सुधारणा करावी, असे निवेदन देण्यासाठी मनसेने महापौरांच्या निवासस्थानाबाहेर मोर्चा काढला. तसेच, महिलेचा अवमान केला त्यावेळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करावी अशी मागणी मनसेने पोलिस उपायुक्तांकडे केली आहे.

सांताक्रूज- वाकोला येथील पटेल नगरातील माय-लेकाचा विजेचा धक्का लागून झालेल्या दुर्घटनेनंतर निषेध करणाऱ्या महिलांचा अवमान करणाऱ्या तसेच त्यांना धमकी देणाऱ्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांची भेट घेत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत निवेदन दिले आहे.

महापौरांना लिहिलेल्या निवेदनात काय म्हटले आहे -
या संपूर्ण घटनेनंतर “माझी राजकीय प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन करण्याचा प्रयत्न करणा-या मनसे पदाधिका-यांचा मी निषेध करतो” असं मत तुम्ही व्यक्त केलं आहे. पण स्थानिक लोक आणि विशेषत: महिला तुमच्यावर का संतापल्या, हे जाणून घेणं तुम्हाला महत्वाचं वाटलं नाही. स्वत:च्या नावापुढे ‘प्रिन्सिपल’ लावता, पण प्रिन्सिपलसारखं वागत नसाल तर काय फायदा? तुमच्यावर ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तुमच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे करणार आहोत. राज्य महिला आयोगाकडेही तुमच्याविरोधात साधार पुराव्यांसह दाद मागणार आहोत. मात्र हे सारं करताना मुंबईच्या महापौर पदाची शान धुळीला मिळणार, याविषयी खेद वाटतोय. म्हणूनच ‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगून’ तुम्ही तत्काळ महापौरपदाचा राजीनामा द्यावा आणि महापौरपदाचा उरला-सुरला मान जपावा, ही तुमच्याकडे ‘शेवटची मागणी’ ! असे मनसेने महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !