‘या’ आठ विद्यमान मंत्र्यांचा निवडणुकीत पराभव - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

24 October 2019

‘या’ आठ विद्यमान मंत्र्यांचा निवडणुकीत पराभव


मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. विशेष म्हणजे महायुतीतील आठ विद्यमान मंत्र्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. यामध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषीमंत्री अनिल बोंडे, दुग्धविकास मंत्री अर्जुन खोतकर, वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके आणि मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय बेगळे यांचा आजच्या निकालात पराभव झाला आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांनी ज्या नेत्यांना भावी मंत्री घोषित केले होते त्यापैकी चार उमेदवारांचा पराभव झाला आहे.

परळी मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एका मोठ्या अनपेक्षित निकालाची नोंद झाली आहे. बीडच्या परळीमध्ये मुंडे बंधू-भगिनींमध्ये मोठी लढत यावेळी पाहायला मिळाली आणि अखेर या लढतीमध्ये धनंजय मुंडे यांनी बाजी मारली आहे. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव करत विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये झालेल्या भावनिक वादाची मोठी चर्चा झाली होती. त्यावरून मोठी टीका देखील झाली होती. भावनेचं राजकारण केलं जात असल्याची टीका केली गेली. मात्र, अखेर त्यात धनंजय मुंडेंचा विजय झाला आहे. यावर पहिली प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे यांनी पराभवाची जबाबदारी घेत पराभव मान्य केला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघ हा राम शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. राम शिंदे हे २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकून आले होते. विशेष म्हणजे राम शिंदे हे अहिल्यादेवी होळकर यांचे वडील माणकोजी शिंदे आणि आई सुशिलाबाई शिंदे यांच्या घराण्यातील नववे वंशज आहेत, असे मानले जाते. त्यामुळे जनतेचा कल नेहमीच राम शिंदे यांच्या बाजूला होता. विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांचे पार्सल घरी पाठवावे असे म्हटले होते. मात्र, रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडच्या मतदारांच्या मनात जागा बनवली आणि त्यांचा विजय झाला. काही दिवसांपूर्वी बीडचे जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपकडून त्यांना मंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनीच त्यांचा पराभव केला. 

कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा अमरावतीच्या मोर्शी मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार द्रेवेंद्र भुयार यांनी पराभव केला आहे. जालना विधानसभा मतदारसंघाचा निकाल बघून अनेकांच्या भूविया उंचावल्या आहेत. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचा कैलास गोरंट्याल यांनी पराभव केला आहे. पुरंदरमध्ये काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांनी शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघात अजित पवार शिवतारे कसा निवडून येतो, तेच बघतो असे म्हणाले होते. अखेर शिवतारे यांचा पराभव झाला आहे. मावळ मतदारसंघात भाजपचे मदत व पुनर्वसन मंत्री संजय (बाळा) भेगडे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी त्यांचा पराभव केला आहे. वन राज्य मंत्री आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचा देखील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. मतमोजणी सुरु झाल्यापासून फुके आघाडीवर होते. मात्र, संध्याकाळपर्यंत चित्र पालटले. काँग्रेसचे उमेदवार आणि माजी खासदार नाना पटोले यांनी सहा हजार मतांच्या फरकाने फुके यांचा पराभव केला आहे.

Post Top Ad

test