यूपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये - अशोक चव्हाण यांनी संजय राऊतांना फटकारले

0

मुंबई - शिवसेनेशी आमची आघाडी केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असून, राज्यातील आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर झाली आहे. किमान समान कार्यक्रम प्रमाण मानून काँग्रेसने आघाडीचा महाराष्ट्रापुरता निर्णय घेतलेला आहे. शिवसेना अजूनही यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा सल्ला शिवसेनेने देणे उचित नाही, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांना फटकारले.

केंद्रातील यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत संजय राऊत यांचा विधानाचा समाचार घेतला आहे. ‘आम्ही शरद पवार यांचा आदर करतो. ते देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. पवार यांच्याविषयी काही बोलणे मला योग्य वाटत नाही. आपण यूपीएचे नेतृत्व करणार असल्याच्या वृत्ताचा दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच इन्कार केलेला आहे. यूपीएचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केलेले आहे,’ याकडेही अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले.

‘शिवसेना ही यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे जो पक्ष यूपीएमध्ये नाही, त्या पक्षाने यूपीएचे नेतृत्व कोणी करावे याचा सल्ला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. देशभरातील यूपीएमध्ये सहभागी असलेल्या सर्व घटक पक्षांनी यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी करावे असे एकमताने मान्य केलेले आहे. सोनिया गांधी यूपीएचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे यूपीएच्या नेतृत्वाबद्दल दुस-या पयार्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे अशोक चव्हाण यांनी ठामपणे सांगितले.

खान्देशातील एकनाथराव खडसे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांची केंद्रीय तपास यंत्रणामार्फत चौकशी होऊ शकते असा त्यांना अंदाज असावा. त्यामुळे राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश करताना एकनाथराव खडसे म्हणाले होते की, केंद्राकडे ईडी असेल तर माझ्याकडे सीडी आहे. मला वाटते की त्यांची सीडी बाहेर येऊ शकते, असे मतही अशोक चव्हाण यांनी एका प्रश्नावर व्यक्त केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)