मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचे कारस्थान - आशिष शेलार

Anonymous
0


मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक असतानाही आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कोरोनास्थितीचा बहाणा करून निवडणुका आणखी दोन वर्ष पुढे ढकलण्याचा व काही प्रभाग फोडण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबई महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. निवडणुकीला जवळपास ९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र आधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर गंभीर आरोप केला. शिवसेना कोरोनाचे कारण पुढे करून पालिका निवडणुक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा कारस्थान रचत आहे. काही प्रभाग फोडण्याचाही डाव असल्याचा आरोप शेलार यांनी केला.

शिवसेनेचा जुनी प्रभाग रचना बदलण्याचा प्रयत्न होता, मात्र तो फसल्याच्या दावाही शेलार यांनी केला. ते म्हणाले की, "जे प्रभाग आजन्म शिवसेना किंवा काँग्रेसला जिंकताच येणार नाही, अशा प्रभागांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु आहेत." नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण पुढे करून आता जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदारनोंदणी करण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे आम्हाला जास्तीचा वेळ लागेल. म्हणजेच २०२१ च्या जनगणनेवर नवीन प्रभागरचना करता येऊ शकेल, म्हणून आताच्या महापालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचा, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचा आणि शिवसेनेचा निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा कुटिल प्रयत्न सुरु असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. मात्र शिवसेनेच्या या कुटील डाव फसणार असल्याचेही शेलार म्हणाले.

शिवसेनेने आरोप फेटाळले -
शेलार यांच्या आरोपात काही तथ्य नसल्याचे सांगत शिवसेनेने हे आरोप फेटाळले आहेत. गेल्या निवडणुकीत स्वत:च्या कार्यकाळात विभाग फोडून आकडे मिळवले, ते आता निसटून जात असल्याचे दिसल्यानंतर शेलार यांच्याकडून बेताल वक्तव्य केली जात आहेत. मुळात शिवसेना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. उद्याच निवडणुका घ्या, आम्हाला काहीच अडचण नाही. निवडणूक हा लोकशाहीचा भाग आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)