मुंबईत २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा

Anonymous
0


मुंबई - मुंबईत शनिवारपासून दमदार हजेरी लावलेल्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेत बुधवारी पुन्हा झोडपून काढले. पहाटेपासून जोरदार बरसलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. समुद्राला ४.१२ मिटरची भरती असल्याने समुद्राला उधाण आले होते. मध्य व हार्बरमार्गावरी रेल्वे वाहतूक १५ ते २० मिनिटांनी उशिरा धावत होत्या. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. पावसाने दुपारनंतर काहीशी उघडीप केल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. येत्या २४ तासात मुंबई व आजूबाजूच्या शहरांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

शनिवारी मध्यरात्रीपासून व रविवारी दिवसभर मुंबईत तुफान पाऊस कोसळला. यात तीन ठिकाणी कोसळलेल्या दरडीने ३० जणांचा बळी घेतला. सोमवारीही पावसाने बॅटिंग सुरुच ठेवली. मंगळवारी पावसाने काहीशी विश्रांती घेत बुधवारी पुन्हा सकाळपासून काही तास जोरदार बरसला. सकाळी ९ वाजून ५२ मिनिटांनी समुद्राला भरती असल्याने समुद्राला उधान आले होते. ४. १२ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनीही समुद्राला भरती होती. समुद्राला भरती व याचवेळी जोरदार पाऊस कोसळल्याने मीठी मिठी नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचली होती. त्यामुळे बाजूच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सायनमध्ये गुरुकृपा हॉटेल परिसर, गांधी मार्केट, साधना विद्यालय, चेंबूर शेलकॉलनी, चुनाभट्टी, वांद्रे, मिलन सबवे आदी सखल भागात पाणी साचले होते.

पावसाची नोंद -
शहरात - ४४.४ मिमी
पूर्व उपनगरांत - ४१.० मिमी
पश्चिम उपनगरांत - ४६.०८ मिमी

पडझडीच्या घटना -
पूर्व उपनगरांत दोन ठिकाणी घर व घराच्या भिंती कोसळल्या. तर पूर्व उपनगरांत ३ व पश्चिम उपनगरांत ६ अशा एकूण ९ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या कोसळल्या. या घटनांत कोणालाही मार लागलेला नाही.

पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट -
मुंबई, ठाणे व नवीमुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जाहिर करण्यात आला असून काही ठिकाणी मुसळधार तर अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)