मुंबई - मुंबई महापालिकेच्या माझगाव येथील मालकीच्या असलेल्या भूखंडावर बेस्ट कर्मचाऱ्यांची वसाहत उभारण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिका प्रशासनाने या भूखंडाच्या आरक्षणात बदल केल्याने बेस्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथील सदनिका खाली कराव्या लागणार आहेत. सन २०१४ - ३४ च्या आराखड्यानुसार या वसाहतींच्या ठिकाणी रुग्णालयाला आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणामुळे बेस्ट उपक्रमाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. दरम्यान, बेस्ट उपक्रमाने हा भूखंड पालिकेला हस्तांतरीत करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला असून पालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर केला आहे.
माझगाव येथे पी डि मेलो मार्गावरील ३७८.३१ चौरस मीटरच्या भुखंड १९२८ मध्ये बेस्ट उपक्रमाने पालिकेकडू ४० रुपये प्रती चौरस यार्ड या दराने भाड्याने घेतला आहे. १९६५ पासून येथे अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. येथे सहा सदनिका आहेत. तसेच विद्युत वितरण उपकेंद्र, दोन दुकाने आणि तळमजल्यावर विद्युत देयक जमा केंद्र आहे. १९९१ च्या पालिकेच्या विकास आराखड्यात हा भूखंड अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठीच आरक्षित होता. मात्र पालिकेने २०१४-३४ या विकास आराखड्यात हा भूखंड रुग्णालयासाठी आरक्षित केला. त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये पालिकेचे अतिरीक्त पी. वेलरासू यांच्याकडे बेस्टचे महाव्यवस्थापक म्हणून अतिरिक्त कार्यभार असताना त्यांच्या दालनात झालेल्या संयुक्त बैठकीत बेस्टच्या अधिकाऱ्यांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे तसेच सुविधाही स्थलांतरीत करुन हा भूखंड पालिकेने ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत.
एक कोटीची भरपाई -
येथील जमीन ताब्यात घेताना पालिका बेस्टला १ कोटी ८८ लाख रुपयांची भरपाई देणार आहे. मात्र, ही रक्कम अत्यंत अल्प आहे. त्यामुळे बेस्टकडून अधिकच्या रक्कमेची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचा नंतर निर्णय घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट करण्यात आले आहे.