मुंबई पालिका निवडणुकीसाठी मनसेकडून ‘एकला चलो रे’

Anonymous
0


मुंबई - पालिका निवडणुकीसाठी मनसेकडून ‘एकला चलो रे’चा नारा देण्यात आला आहे, अशी माहिती मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे. मनसेच्या या ना-यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपासून मनसे आणि शिंदे गटातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने युतीच्या चर्चेला उधाण आले होते. मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि शिंदे गट युती करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

संदीप देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी सर्व पालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार आहे. मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, मुंबईत सर्व जागांवर मनसेचे उमेदवार उभा करण्यात येणार आहेत. मुंबईत २२७ जागांवर उमेदवार उभा करणार असल्याची माहितीदेखील संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

युती हा जर-तरचा विषय आहे. आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. कुठल्याही पक्षाचा बालेकिल्ला नसतो. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य कायम ठेवण्यासाठी पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. यासोबतच, राज ठाकरेंच्या आदेशानुसार तयारीला सुरुवातदेखील केली असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.

तसेच, मनसेचा विदर्भ दौरा सुरू होत आहे. पक्षवाढीसाठी हा दौरा करण्यात येणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. यासोबतच, दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले. दसरा मेळावा कधी आणि कुठे होतोय हे महत्त्वाचे नाही. बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत हे महत्त्वाचे आहे. बाळासाहेबांचे विचार फक्त राज ठाकरे मांडतायत. त्यामुळे कोणाचा मेळावा कुठे होतो याला फार महत्त्व नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)