सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे द्या, अन्यथा आंदोलन

0

 

मुंबई - मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेद्वारे घरे देण्याचा निर्णय झाला. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पालिकेतील सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावीत यासाठी त्वरित जी आर काढावा अन्यथा दिवाळी सणादरम्यान प्रत्येक पालिका कार्यालयात आंदोलन करू असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनकडून देण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेद्वारे मालकी हक्काची घरे देण्यासंबंधीचा निर्णय २२ ऑक्टोबर २००८ साली झाला होता. २००९ साली फक्त ५० कामगारांना मालकी हक्काची घरे दिली, त्यानंतर महापालिकेने एकाही कामगाराला मालकी हक्काचे घर दिलेले नाही. सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावीत म्हणून १३ मार्च २०२२ रोजी आघाडी सरकारमधले त्यावेळचे नगरविकास मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील बंगल्यावर सविस्तर चर्चा केली. १४ मार्च २०२२ रोजी आझाद मैदानावर सफाई कामगारांचा मोर्चा काढला. राज्य सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये चर्चा झाली. १२ हजार सफाई कामगारांना आश्रय योजनेद्वारे घरे बांधून देण्याची घोषणा केली. परंतू आश्रय योजनेला कामगारांचा तीव्र विरोध असून १४ हजार घरे बांधली जाणार आहेत, ती घरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेद्वारेच मालकी हक्काची घरे कामगारांना देण्याची मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे. 

जर का दिवाळी सणापूर्वी सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देण्या संबंधीचा शासकीय आदेश (जी.आर.) काढला नाही तर ऐन दिवाळी सणाच्या दिवशी सफाई कामगार विभागवार निदर्शने करणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली. सफाई कामगारांच्या घराबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार तसेच उपायुक्त चंदा जाधव यांची युनियनच्या वतीने भेट घेण्यात आल्याचे जाधव यांनी संगितले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)