मुंबई - मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने १० ते १८ ऑक्टोबरपर्यंत १३९४२ दुकानांची तपासणी केली. या तपासणीत ३०३४ दुकानांच्या प्रवेशद्वारावर अद्याप मराठी पाटयांची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार, असे पालिकेच्या दुकान व आस्थापने विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले..
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम ७ नुसार मराठी भाषेतून ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. याबाबत पहिल्यांदा ३१ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र व्यापारी संघटनांनी कोरोनाचा फटका आणि आर्थिक कारण देत तीन वेळा मुदत वाढवून घेतली होती. ही अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली. यादरम्यान, व्यापारी संघटनांनी पालिकेच्या कारवाईच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र याबाबत न्यायालयाकडून पालिकेला कोणत्याही सूचना आल्या नसल्याने पालिकेने १० ऑक्टोबरपासून सर्व २४ वॉर्डमध्ये कारवाईला सुरू केली आहे. १० ते १८ ऑक्टोबर दरम्यान केलेल्या तपासणीत ३०३४ दुकानांवर मराठी पाट्या नसल्याने नोटीस बजावण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment