पालिका दहिसर नदी किनारी संरक्षक भिंत उभारणार

Anonymous
0


मुंबई - मुसळधार पावसांत झोपडपट्टी तसेच कोळीवाड्यालगत असलेल्या नदीला पूर आल्यानंतर तसेच याचवेळी समुद्राला भरती असल्यास किनाऱ्यालगतच्या झोपडपट्टय़ांमध्ये पाणी घुसते. हे प्रकार दरवर्षीच्या जोरदार पावसांत होत असल्याने येथील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून अनेक ठिकाणी पालिकेडून संरक्षक भिंती उभारल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर दहिसर नदीलाही पूर येत असल्याने नदी किनाऱ्यालगत संरक्षित भिंत उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कामासाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. नवीन वर्षात या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि उपनगरात वाढणा-या लोकसंख्येमुळे रिकाम्या जागा भरून जात आहेत. त्यामुळे अनेकजण समुद्राच्या आणि नदीच्या परिसरात वसाहती उभारून वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे मुसळधार पावसांत नदी आणि समुद्राचे पाणी या लोकवस्तीत शिरते. दहिसर नदीचे पाणीही पावसाळ्यात नागरी वस्तीत शिरत असल्याने तेथील रहिवासी त्रस्त आहेत. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पावसाळ्यात नदी किनाऱ्यालगतच्या झोपडपट्टीधारकांना पावसाळ्यात झोपडयात पाणी भरण्याची उद्धभवणारी समस्या दूर होणार आहे.

महापालिकेकडून नदी किनारी आरसीसी संरक्षण भिंत बांधण्यात येणार असून या भिंतीमुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली तरी, नदीचे पाणी झोपडपट्टी भागात घुसणार नाही. संपूर्ण नदीकिनारी टप्प्याटप्प्याने संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. आतापर्यंत बोरिवली-दहिसर रेल्वे मार्गा लगत संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात दहिसर नदी किनाऱ्यालगतच्या साईनाथ नगर, अंबा आशिष, अभिनव नगर, श्रीकृष्ण नगर आदी झोपडपट्टी भागातून जाणाऱ्या नदीकिनारी संरक्षित बांधण्यात येणार आहे. यासाठी ९८ कोटी ९९ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. जानेवारी २०२३ मध्ये या कामाला सुरुवात झाल्यानंतर पावसाळा वगळून १८ महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून सांगण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)