Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

महाविकास आघाडीचा हल्लाबोल !


मुंबई - महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यासह विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीने शनिवारी सरकार विरोधात आक्रमक होत महामोर्चा काढला. सकाळी साडे अकरा वाजता हा मोर्चा भायखळा येथील रिचर्डसन्स क्रुडास येथून टाइम्स ऑफ इंडियापर्यंत लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात हल्लाबोल, राज्यपाल कोश्यारी हटाव, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. हातात महापुरुषांच्या फोटोंचे फलक, पक्षांचे झेंडे घेऊन लाखोंच्या संख्येने निघालेल्या मोर्चाने भायखळा ते सीएसएमटीपर्यंतचे रस्ते गर्दीने भरून गेले होते. सरकारविरोधातील या हल्लाबोल मोर्चात महाविकास आघाडीसह शेकाप, सीपीआय, कम्युनिस्ट पक्ष, जनता दल सेक्युलर, संभाजी ब्रिग्रेड आदी १८ पक्ष, संघटनांचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महापुरुषांबाबत काढलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर मागील काही दिवसांपासून राज्यात संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच भाजपमधील काही नेत्यांनी काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात मोर्चे आंदोलने केली जात आहेत. शनिवारी महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चाचे आयोजन केले होते. भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास मिल येथून सकाळी साडे अकरा वाजता मोर्चा लाखोंच्या संख्येने निघाला. जे. जे. मार्ग उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, टाइम्स ऑफ इंडियापर्यंतचा रस्ता गर्दीने फुलून गेला होता. राज्य भरातील कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्यने मोर्चात सहभागी झाले होते. मोर्च्यात तरुणाईही एकवटलेली दिसत होती. हातात महापुरुषांच्या फोटोंचे फलक, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचे पुतळे, पक्षांचे झेंडे, घोषणांचे बॅनर्स घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. कार्येकर्ते आक्रमक झालेले दिसत होते. अगदी शिस्तीने मोर्चा निघाला. मोर्च्याने रस्ते भरून गेल्याने येथील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मध्य मुंबईतून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भायखळा येथून नागपाडा जंक्शनमार्गे मुंबई सेंट्रल येथून पुढे चिंचपोकळी, सातरस्ता मार्गे आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल या रस्त्याने दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी वाहतूक खुली होती. चार रस्ता, रफी अहमद किडवाई मार्ग, पी डिमेलो मार्गेही दक्षिण मुंबईत जाण्यासाठी वाहतूक सुरु होती. वाहतूकीचे नियोजन करण्यात आल्याने फारसी वाहतूक कोंडी झाली नाही.

अडीच हजारहून अधिक पोलिस तैनात -
मोर्चाच्या ठिकाणी सुमारे अडीच हजारहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून महामोर्चावर नजर ठेवण्यात आली होती. महामोर्चाच्या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक तसेच सीआरपीएफची तुकडीही बंदोबस्तासाठी तैनात होती.

मोर्च्यात सहभागी झालेले नेते -
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, अजिक पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, नाना पटोले, आदित्य ठाकरे, संजय राऊत, माणिकराव ठाकरे, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, अबु आझमी, जयंत पाटील (शेकाप), कपील पाटील, प्रकाश रेड्डी आदी नेते मोर्च्यात सहभागी झाले होते.

हा मार्ग वाहतुकीसाठी बंद -
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रिचर्डसन्स क्रूडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नवरोजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टाईम्स ऑफ इंडिया हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते.

या पर्यायी मार्गांचा वापर -
दक्षिण मुंबईत प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी गॅस कंपनी-चिंचपोकळी पूल- आर्थर रोड- सात रास्ता सर्कल- मुंबई सेंट्रल- लॅमिंग्टनरोड- ऑपेरा हाउस-महर्षी कर्वे रोड (क्वीन्स रोड), सात रस्ता सर्कल- मुंबई सेंट्रल- तारदेव सर्कल- नाना चौक- एन.एस. पुरंदरे रोड या पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरु होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग- खडा पारसी- नागपाडा जंक्शन- दो टाकी- जे.जे. जंक्शन मोहम्मद अली रोड, नागपाडा जंक्शन- मुंबई सेंट्रल-नाना चौक-एन. एस. पुरंदरे रोड, भायखळा जिजामाता उद्यान (राणी बाग) येथून दक्षिण मुंबईकडे वाहतूक वळवली होती. तसेच संत सावता रोड- मुस्तफा बाजार- रे रोड- स्लीप रोड- बॅरिस्टर नाथपै रोड- पी डी मेलो रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गांनी दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरु होती.

महामोर्चासाठी टीशर्ट -
महाविकास आघाडीने महामोर्चासाठी खास टीशर्ट तयार केले होते. यावर हल्लाबोल असे टीशर्टवर लिहिण्यात आले होते. मोर्चात हे टीशर्ट लक्ष वेधून घेत होते.

टाइम्स इंडियासमोर मोर्चोचे सभेत रुपांतर -
भायखळ्यातून जे जे उड्डाणपूलाजवळ मोर्चा आल्यानंतर सरकारविरोधातील जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. टाइम्स इंडियासमोर मोर्चोचे सभेत रुपांतर झाले. सभेसाठी रस्त्यावरच भव्य स्टेज उभारण्यात आला होता. सभेच्या ठिकाणी एकच गर्दी झाली. मोर्चेकरी टाइम्स इंडिया इमारतीच्या बाजूच्या जागेत तसेच बाजूला रेल्वेस्थानकात विखुरले गेले. आयोजकांचे या ठिकाणी नियोजन नसल्याने मोर्चेकरी एकाच ठिकाणी खिळून न राहता आजूच्या बाजूच्या परिसरात विखुरले होते. सभास्थानी विविध पक्षातील नेते मंडळी दाखले झाले. स्टेजवर मात्र मोजक्याच नेत्यांची भाषणे झाली. कोणताही गोंधळ न होता मोर्चाचा या ठिकाणी समारोप झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom