मुंबई - घाटकोपर (पूर्व) येथील सहा मजली विश्वास इमारतीच्या तळ मजल्यावरील जुनोज पिझा हॉटेलच्या मीटर बॉक्समध्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले. जखमींमध्ये ४ पोलिसांचा समावेश आहे. या आगीची झळ इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पारेख रुग्णालयाला बसली. रुग्णालयात २० ते २५ रुग्ण उपचारासाठी दाखल होते. आगीचा भडका उडताच २२ रुग्णांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने दिली. दरम्यान आग शॉर्टसर्किटने लागल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
दोन दिवसांपूर्वी करी रोड येथील अविघ्न इमारतीच्या २२ व्या मजल्यावर लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच शनिवारी घाटकोपर पूर्व येथील विश्वास इमारतीतील जुनोज पिझा हॉटेलच्या मीटर बॉक्सला शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग काही क्षणातच भडकून पसरली. आगीचा दूर तिस-या मजल्यावर असलेल्या पारेख रुग्णालयापर्यंत पोहचला. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. सुरक्षिततेच्या कारणामुळे पारेख रुग्णालयातील २२ रुग्णांना इतर रुग्णालयात सुखरूप हलवण्यात आले. मात्र या आगीत कुरेशी देढीया (४६) याचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु असून या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान इमारत जुनी आहे. इमारतीत अग्नी सुरक्षा यंत्रणा नव्हती, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख संजय मांजरेकर यांनी दिली.
रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे प्रयत्न ! -
हॉटेल मध्ये आग लागल्याचे कळताच रुग्णालयातील रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण दिल्याने त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. रुग्णांना तात्काळ हलवण्यात त्यांची मदत झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर -
या आगीच्या घटनेनंतर आता उपहारगृहातील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील उपाहारगृहांची झडती घेतली. त्यात ९२ उपाहारगृहांत अग्निशमन यंत्रणा नसल्याने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. उपहारगृह व हॉटेलांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा सुरू असणे बंधनकारक आहे. तसा फलक उपहारगृहाच्या बाहेर लावणेही बंधनकारक असताना अनेक हॉटेल हा नियम पाळत नाहीत.
३० विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका ! -
विश्वास इमारतीत चौथ्या मजल्यावर खासगी क्लास चालविला जातो. आगीची दुर्घटना ओढवली तेव्हा त्या वर्गात सुमारे ३० विद्यार्थी शिकत होते. आग आणि धुराची तीव्रता लक्षात घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. या इमारतीवरील गच्चीवरुन दुसऱ्या विंगमध्ये येण्यासाठी असलेल्या मार्गावरुन सर्व विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यासाठी दलाचे अधिकारी, जवान समयसूचकतेने आणि धाडसाने कर्तव्य बजावत असल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख संजय मांजरेकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment