Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कोकण रेल्वे परिसरातील ३७ स्थानकांचे होणार सुशोभिकरण


मुंबई - कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके असून सदर रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाश्यांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. त्याचप्रमाणे, रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठया प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार संपन्न झाला. यामुळे, कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

सह्याद्री अतिथी गृह येथे कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, यावेळी केंद्रिय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग, मुख्य अभियंता नागनाथ राव, मुख्य व्यवस्थापक गिरीश करंदीकर, उप अभियंता सुधीर कुलकर्णी भाजपा सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, दिपक पटवर्धन, केदार साठे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकणातील पर्यटन स्थळे देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. सामंजस्य करारामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील रस्त्यांचा विकास होईल, जेणेकरून पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करणार : मंत्री रविंद्र चव्हाण
कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परस्पर सहकार्यामुळे ही सर्व कामी गतीने पूर्ण होतील, तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना याचा खऱ्याअर्थाने लवकरच फायदा होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. 

कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाचे देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभिकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सदर रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. भविष्यात हा सामंजस्य करार ३० वर्षापर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे. या सामंजस्य करारान्वये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रेल्वे स्थानकांच्या पोहोचमार्गाचे डांबरीकरण व सिमेंट कॉंक्रीटीकरण करुन या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या सर्व प्रमुख रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभिकरण याच सामंजस्य कराराअंतर्गत हाती घेण्यात येणार आहे. या सुशोभिकरणाच्या अंतर्गत रेल्वे प्रवाश्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सदर रेल्वे स्थानकांचा परिसर हा अत्याधुनिक स्वरुपाचा करण्याचा आमचा मानस असल्याचेही मंत्री चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom