एक तास...वसुंधरा संरक्षणासाठी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एक तास...वसुंधरा संरक्षणासाठी

Share This

मुंबई : आज संपूर्ण जगभरात 'अर्थ अवर' हा उपक्रम राबवला जात आहे. स्वत:च्या आलिशान जीवनासाठी पर्यावरणावर आघात करणार्‍या मनुष्याने आता वसुंधरा अर्थात पर्यावरणाच्या संरक्षणासाठी योगदान देण्याची गरज आहे. हीच निकड लक्षात घेऊन 'डब्ल्यूडब्ल्यूएफ इंटरनॅशनल' या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने शनिवारी रात्री ८.३0 ते ९.३0 हा एक तास 'अर्थ अवर' म्हणून पाळला जात आहे. या उपक्रमात मुंबईसह देशातील १५0 हून अधिक शहरे सामील होत असून मुंबईकरांनी वसुंधरेसाठी एक तास अर्पित करावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

'अर्थ अवर' या पर्यावरणविषयक उपक्रमाची २00७ मध्ये सिडनीत सुरुवात झाली. सद्यस्थितीत वैश्‍विक पातळीवर राबवला जात असलेल्या या उपक्रमाचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. पर्यावरणातील बदल व परिणाम याविषयी जनजागृती घडवण्यासाठी संपूर्ण जगभरातील ७ हजारहून अधिक शहरे या उपक्रमात सामील होत आहेत. भारतातील शहरांची संख्या यंदा वाढण्याची शक्यता आहे, असे 'अर्थ अवर' उपक्रमाचे मुख्य प्रवर्तक अँण्डी रिडले यांनी सांगितले. उपक्रमांतर्गत शनिवारी रात्री ८.३0 ते ९.३0 या वेळेत सर्व नागरिकांनी आपल्या घरी तसेच आस्थापनाच्या ठिकाणी विजेचा वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. गतवर्षी या उपक्रमात नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद या महानगरांसह शेकडो शहरांनी सहभाग घेतला होता. उपक्रमाला संपूर्ण जगभरातून अब्जावधी लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. 'अर्थ अवर'दरम्यान गेट वे ऑफ इंडिया, सिडनी ओपेरा हाऊस, हार्बर ब्रिज, कौलालम्पूर येथील 'द पेट्रॉनास टॉवर्स', सिंगापूर येथील मरिना बे सॅण्ड्स, द टोकियो टॉवर, बीजिंगमधील 'द बर्ड्स नेस्ट', यूके हाऊस ऑफ पार्लमेंट, बकिंगहम पॅलेस आदी प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणचाही वीजपुरवठा बंद राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages