दोषी पालिका अधिकार्‍यांवर कारवाईचे आदेश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दोषी पालिका अधिकार्‍यांवर कारवाईचे आदेश

Share This
विंदां ऐवजी सुरेंद्र मोहन यांचे छायाचित्र
मुंबई / (  http://jpnnews.webs.com ): मुंबई महानगरपालिकेने सन २0१0 पासून मराठी भाषा पंधरवडा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या वर्षी मराठी भाषा पंधरवडा साजरा करताना साहित्यिकांना सन्मानित करण्यासाठी जी पुस्तिका काढली, त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक वि. दा. करंदीकर यांच्या छायाचित्राऐवजी समाजवादी नेते सुरेंद्र मोहन यांचे छायाचित्र प्रसिद्ध करून आपल्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडवले. या प्रकरणात दोषी असणार्‍या शिक्षण विभागातील संबंधित अधिकार्‍यांची दोन वेतनवाढ रोखण्यात यावीत, अशी मागणी मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी केली.

मुंबई महानगरपालिकेने २७ फेब्रुवारी ते १३ मार्चपर्यंत मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याचे औचित्य साधून मराठीतील महान साहित्यिकांना सन्मानित करण्यासाठी कविवर्य वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर आणि वि. दा. करंदीकर या तीन महान साहित्यिकांची माहिती देणारी पुस्तिका काढली होती. या पुस्तिकेत साहित्यिक विंदा करंदकर यांच्या छायाचित्राऐवजी समाजवादी नेते कै. सुरेंद्र मोहन यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यामुळे पालिकेच्या अकलेचे दिवाळे निघाले असून पालिकेच्या या चुकीमुळे महाराष्ट्रातील जनतेला शरमेने मान खाली घालायला लावल्याचा आरोप लांडे यांनी केला. 

ही पुस्तिका मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने काढली असल्याने ज्या शिक्षकांवर पालिकेच्या साडेचार लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे, त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर आता चिंता व्यक्त करण्याची वेळ आली असल्याचे लांडे यांनी सांगितले. ज्ञानपीठ विजेते विंदांना महानगरपालिकेचे प्रशासन ओळखू शकले नाही, हाच का आमचा मराठीबाणा, असा उपरोधिक टोलाही लांडे यांनी पालिकेला लगावला. 

दरम्यान, पालिका आयुक्तांनी याप्रकरणी शिक्षण विभागातील संबंधित दोषी अधिकार्‍यांना फैलावर घेतले. मात्र एवढे पुरेसे नसून या प्रकरणात दोषी अधिकार्‍यांच्या दोन वेतनवाढी रोखण्यात याव्यात, अशी मागणी लांडे यांनी या वेळी केली. या मागणीवर स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा, असे आदेश पालिका प्रशासनाला दिले. हा प्रकार अतिशय निंदनीय असून यासंदर्भात शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकार्‍याची चौकशी होणे आवश्यक असल्याचेही शेवाळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages