अंगणवाड्यांमधील जेवण जनावरांनाही देण्यायोग्य नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अंगणवाड्यांमधील जेवण जनावरांनाही देण्यायोग्य नाही

Share This

लोकलेखा स्थायी समितीच्या अहवालात ठपका
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेमध्ये सादर झालेल्या लोकलेखा समितीच्या (पीएसी) अहवालानुसार महिला स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून अंगणवाडीतील मुलांना वितरित केले जात असलेले जेवण एकदम निकृष्ट दर्जाचे असते. एवढेच नव्हे तर ते जनावरांना खायला देण्याच्याही योग्यतेचे नसते, असे या अहवालात म्हटले आहे. 

समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जेवणामध्ये प्रोटिन्स आणि कॅलरी अनिवार्य असतात. परंतु मुलांना देण्यात येत असलेल्या या जेवणाचा स्तर इतका खराब आहे की, ते जेवण जनावरेही खाणार नाहीत. लोकलेखा समितीने महिला आणि बालकल्याण विभागाला लाभार्थींना दिल्या जाणार्‍या जेवणामध्ये आवश्यक प्रोटिन्स आणि कॅलरीज आहेत की नाहीत, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या विभागाने तीन महिन्यांच्या आत लोकलेखा समितीला आपला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 

महिला स्वयंसहायता गटांना अंगणवाड्यांतील सहा महिने ते तीन वर्षांच्या मुलांसाठी पौष्टिक जेवण देण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. मात्र या जेवणाची तपासणी एका सरकारी प्रयोगशाळेत केली गेली असता ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. भंडारा जिल्ह्यामध्ये तर जेवणामध्ये प्लास्टिकचे तुकडे सापडले. विभागाच्या अधिकार्‍यांनी समितीला सांगितले की, त्यांनी जवळपास ९0 हजार अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाच्या जेवणाच्या तक्रारी आल्या आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages