कारवाईत डॉ. आंबेडकरांची प्रतिमा तुटली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कारवाईत डॉ. आंबेडकरांची प्रतिमा तुटली

Share This
ठाण्यात तणाव
ठाणे : ठाणे महापालिकेने केलेल्या कारवाईत वागळे इस्टेटमधील आंबेवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तुटल्याने या भागात बुधवारी दुपारी तणाव निर्माण झाला. पालिका अधिकार्‍यांनी हेतुपुरस्सर प्रतिमा तोडल्याचा आरोप महासभेत आरपीआयचे नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी केला. यासंदर्भात महापौर हरिश्‍चंद्र पाटील यांनी चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या समितीच्या माध्यमातून आठ दिवसांत त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी महासभेत दिले.

बुधवारी दुपारी वागळे इस्टेट येथील इंदिरा नगर भागात एका भूखंडावर होत असलेल्या बांधकामाबाबत पालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पालिकेच्या सहाय्यक आयुक्त छाया मानकर यांच्या निर्देशाने पालिकेचे पथक हे बांधकाम पाडण्यासाठी आंबेवाडी येथे गेले. तेथील अनधिकृत बांधकाम पडत असताना उभारलेल्या चौथार्‍यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. कारवाई दरम्यान ही प्रतिमाही तुटल्याने अचानक तणाव निर्माण झाला. आंबेडकरी जनता मोठय़ा संख्येने या घटनेचा निषेध करण्यासाठी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात जमा झाली. त्यामुळे या भागात तणाव वाढला होता. याच दरम्यान महापालिकेच्या महासभेत आरपीआयचे नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी ही गंभीर घटना सभागृहांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच याला जबाबाबदार असणार्‍या महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त छाया मानकर यांना निलंबित करण्याची मागणी केली. 

महापौर हरिश्‍चंद्र पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत असल्याचे सांगत प्रशासनाला तातडीने माहिती देण्यास सांगितले व पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी आणि स्थानिक नगरसेवक यांची चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली. त्यानंतर चौकशी समिती आठ दिवसांत आपला अहवाल पालिकेला सादर करेल व त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages