विधी समिती अध्यक्ष धमकी प्रकरण / गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विधी समिती अध्यक्ष धमकी प्रकरण / गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा

Share This

मुंबई : पालिकेचे विधी समिती अध्यक्ष अँड़ मकरंद नार्वेकर यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणात खुलासा करताना अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी दिलेले निवेदन दिशाभूल करणारे असल्याचे सांगत सभागृह नेते यशोधर फणसे यांनी निषेध केला. या निवेदनामध्ये एलबीटीचा उल्लेख कशाला? असा सवाल करत फणसे यांनी नाराजी नोंदवल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात गटनेत्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून त्यानंतर स्थायी समितीत याबाबत निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. 

अँड़ मकरंद नार्वेकर यांना आलेल्या जकात दलालांच्या धमकीबाबत तसेच अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे गेल्या वेळच्या स्थायी समितीत सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला गेला होता, मात्र मंगळवारी जलोटा यांच्याकडून केलेल्या निवेदनात त्या धमकीप्रकरणी तसेच इतर आरोपांबाबत कोणतेच समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. उलट जकातनाक्यांवरील दलाली, भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठीच एलबीटी आणत असल्याचा खुलासा केला गेला. गेल्या काही वर्षांत जकातचोरी प्रकरणांमध्ये जकात माफियांचा सहभाग आढळून आल्याचेही प्रशासनाकडून कबूल केले गेले आहे. 

त्या निवेदनावर बोलताना सभागृह नेते यशोधर फणसे यांनी जर जकातचोरी रोखण्यासाठी प्रशासन सबळ असेल तर पुन्हा ८ मे रोजी पुन्हा विधी समिती अध्यक्षांनी जकातचोरीच्या गाड्या कशा पकडल्या? असे विचारत हे अधिकार्‍यांच्या संगनमताशिवाय शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर बोलताना मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी पालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद स्थितीत असून लोकप्रतिनिधी तसेच अधिकार्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतानाही याविषयी या निवेदनात कोणताही खुलासा नसल्याचे म्हटले. नार्वेकर यांना दिलेल्या धमकीनंतर त्यांच्या संरक्षणासाठी काय कार्यवाही केली, याबाबतही या निवेदनात खुलासा नसल्याचे सांगत प्रशासनाने योग्य तो खुलासा करावा, अशी मागणी केली. दरम्यान, या चर्चेनंतर स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी याबाबतीत गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करून स्थायी समितीत त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करून विषय संपवण्याचा निर्णय घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages