कबीर कलामंचच्या कलाकारांचे गृहमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कबीर कलामंचच्या कलाकारांचे गृहमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

Share This

मुंबई - नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे भूमिगत झालेल्या पुण्यातील कबीर कला मंचच्या सागर गोरखे, रुपाली जाधव, ज्योती जगताप आणि रमेश गायचोर या चार कार्यकर्त्यांनी आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. कबीर कलामंचच्या दीपक ढेगळे व सिद्धार्थ भोसले यांच्या अटकेनंतर कलामंचचे हे चारही कार्यकर्ते पोलिसांच्या दडपशाहीला कंटाळून भूमिगत झाले होते. 

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, भापचे प्रकाश रेड्डी, आनंद पटवर्धन, सिमंतिनी धुरी यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले. अतिरेकी विरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त प्रदीप सावंत यांनी त्यांना ताब्यात घेतले. मंत्रालयातील गृहमंत्र्यांच्या दालनात या चार कलाकारांनी आर. आर. पाटील यांच्यासमोर नागनाथअण्णा नायकवडी यांच्यावरचे गीत सादर केले.
ढेगळे व भोसले यांच्या अटकेनंतर कलामंचच्या इतर कार्यकर्त्यांना पोलिस त्रास देत होते, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करत होते. त्यामुळे गेली दोन वर्षे या कार्यकर्त्यांना आपली ओळख लपवून जगावे लागत होते. मात्र आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आत्मसमर्पणाचे पाऊल उचलले आहे. महिनाभरापूर्वीच शीतल साठे व सचिन माळी यांनी विधानभवन परिसरात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. हे सर्व कार्यकर्ते उच्चविद्याविभूषित आहेत.
"आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला व आमचे मूलभूत अधिकार हिसकावून घेण्यात आल्याने आम्हाला भूमिगत व्हावे लागले होते; मात्र आता आम्ही न्यायालयासमोर आमचे निर्दोषत्व सिद्ध करू', असा विश्‍वास सागर गोरखे व रमेश गायचोर यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages