मुंबई- एलबीटीसाठी सरकारकडे विरोध व्यक्त करा. मात्र, बाजारपेठा बंद ठेऊन सामान्य जनतेला वेठीस धरू नका, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यापा-यांना दिला. व्यापा-यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे की विरोध हे मात्र राज यांनी स्पष्ट केलेले नाही.
एलबीटी विरोधात उभे राहिलेल्या व्यापा-यांनी मंगळवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाकरे आपल्याला पाठिंबा देतील, अशी व्यापा-यांना आशा होती. मात्र, ठाकरे यांनी पाठिंबा तर दिला नाहीच, उलट सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नका, असा सल्ला त्यांनी व्यापा-यांना दिला.
तुमचे भांडण सरकारशी आहे. दुकाने बंद केली, तर त्याचा जनतेलाच त्रास होतो. सरकारवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. सरकारबरोबर चर्चा करताना एलबीटीला तुमचा विरोध का आहे, याची रीतसर नीट मांडणी करून ती सरकारला सादर करा. तुम्ही तयार केलेला प्रस्ताव राज्याच्या हिताचा असेल, तरच मनसे तुमच्या पाठिशी उभी राहील, असेही ठाकरे यांनी व्यापा-यांना सुनावले.

No comments:
Post a Comment