लोकप्रतिनिधीनी पालिकेचे विश्वस्त या नात्याने कामे करावीतः महापौर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकप्रतिनिधीनी पालिकेचे विश्वस्त या नात्याने कामे करावीतः महापौर

Share This
मुंबईमध्ये आमुलाग्र बदल करणारी मुंबई महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने पालिकेशी मुंबईकरांचा दैनंदिन संबंध येतो. स्थानिक स्वराज्य संस्थेचे विश्वस्त आणि लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी या नात्याने नगरसेवकांनी जबाबदारी ओळखून नागरी कामे करण्यास प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून असते. जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ध्यास घ्यावा, असा सल्ला मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी महापालिकेच्या नगरसेविकांना दिला. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविकांकरिता महापालिका आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा येथे आयोजित विशेष प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन महापौर सुनिल प्रभु यांच्या हस्ते आज (दिनांक ३ मे, २०१३) सकाळी करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. दोन दिवस चालणाऱया या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नगरसेविका व माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे मानद संचालक एल. ए. लटके, सेवानिवृत्त मुख्य लेखापरिक्षक प्रशांत पिसोळकर, महापालिकेच्या सेवानिवृत्त सचिव मृदुला जोशी यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. 

याप्रसंगी महापौर म्हणाले की, मुंबई शहर आणि महापालिकेचा लौकिक वाढावा यासाठी शहराचा नियोजनबद्ध विकास आणि नागरी प्रश्नांची तड ही लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयावर अवलंबून असते. अर्थसंकल्पीय तरतुदींद्वारे नागरी कामांना गती देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांची असते. नगरसेवक किती चांगले काम करतो याकडे जनतेचे लक्ष असते. महापालिका अधिनियमांच्याआधारे आणि प्रशासनाच्या सहकार्याने नागरी प्रश्न तडीस नेता येतात, असेही यावेळी महापौर म्हणाले. महापालिका प्रशासन, महापालिका सभागृहाची कार्यपद्धती, यासह महापालिका कायदा, सभाशास्त्र, नागरी सेवा-सुविधा वितरण आदी विषयांवर महापौर प्रभु यांनी आपले अनुभव कथन केले.
दोन दिवस चालणाऱया या प्रशिक्षण कार्यक्रमात महिला लोकप्रतिनिधींना विविध विषयांवर विशेष तज्ज्ञांकडून मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये नगरसेवकांचे अधिकार व कर्तव्य, अर्थसंकल्प, सहयोगी सुशासन, शहर स्वच्छता आराखडा, सभाशास्त्र, नागरी सेवा-सुविधा मुल्यांकन आदी विषयांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages