निरपराध तरुणांना गोवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

निरपराध तरुणांना गोवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा

Share This

मुंबई - मालेगावात 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी निरपराध मुस्लिम तरुणांना अनामी रॉय, राजवर्धन, सुबोधकुमार जयस्वाल आणि के. पी. रघुवंशी या पोलिस अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर खोट्या गुन्ह्यांत गोवले, असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केला आहे. या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी असीमानंद याच्या कबुलीजबाबानंतर अटकेत असलेल्या तरुणांची जामिनावर सुटका झाली आहे. त्या निरपराध तरुणांना दोषमुक्त करावे; त्यांना तसे प्रमाणपत्र आणि नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या आमदार आझमी यांनी केल्या. उत्तर प्रदेशात संशयास्पद मृत्यू झालेल्या खालिद मुजाहिद या आरोपीला बहुजन समाज पक्षाच्या सरकारने खोट्या गुन्ह्यांत गोवले होते. त्याच्या मृत्यूची सीबीआयमार्फत आणि न्यायालयीन चौकशी सुरू आहे. ते प्रकरण तेथील समाजवादी पक्षाच्या सरकारने गंभीरपणे घेतले आहे, असा दावा त्यांनी केला. परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार मुजाहिदची हत्या झाल्याचे दिसत नाही. तरीही चौकशीतून सत्य बाहेर यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील सरकार धर्मनिरपेक्ष आणि चांगले आहे; मात्र तेथील अधिकारी जातीयवादी आहेत, असा आरोपही आझमींनी केला.

'इन्साफ करो अभियान' मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झालेल्या आरोपींना न्यायालयाने अद्याप दोषमुक्त केलेले नाही. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी "इन्साफ करो अभियान' राबवण्यात येणार आहे. नागपाडा येथे 8 जूनला होणाऱ्या सभेपासून ही मोहीम सुरू होईल, अशी माहिती आझमी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages