रिक्षांचा १८ जूनपासूनबेमुदत संप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिक्षांचा १८ जूनपासूनबेमुदत संप

Share This
मुंबई :आम्हाला परमिट देताना आरक्षण नको, रिक्षा-टॅक्सींचे आयुष्यमान कमी करण्यात येऊ नये, सहा आसनी टॅक्सी आणि चारचाकी क्वॉड्रिसायकल रस्त्यावर नको, अशा अनेक मागण्यांसाठी येत्या १८ जूनपासून मुंबईसह राज्यातील सुमारे १५ लाख रिक्षाचालक संपावर जातील, असा इशारा मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनतर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईसह राज्यातील जनतेचे हाल होणार, हे निश्‍चित.

रिक्षा-टॅक्सीचे भाडेदर ठरवण्यासाठी हकीम समितीची स्थापना करण्यात आली होती. हकीम समितीने दिलेल्या अहवालामध्ये १६ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या रिक्षा आणि २0 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या टॅक्सी मोडीत काढण्यात याव्यात आणि त्याजागी नव्या गाड्या आणण्यात याव्यात, अशी शिफारस करण्यात आली होती; परंतु सर्व रिक्षा-टॅक्सी या सीएनजीवर चालत असल्यामुळे प्रदूषण होत नाही, असे सांगत मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनने रिक्षा-टॅक्सीचे आयुष्यमान कमी करण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कार कंपन्यांना मदत करून बेस्टला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शरद राव यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्याशिवाय तीन चाकी ऑटोरिक्षाऐवजी क्वॉड्रिसायकल (चारचाकी वाहन), सहा आसनी टॅक्सीला विरोध करण्यात आला आहे. तसेच रिक्षा-टॅक्सींना भाडेवाढ देण्यात यावी, स्वयंरोजगारात ऑटोरिक्षा चालक-मालक आणि टॅक्सी चालक-मालक यांच्यासाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षितता मंडळाची 
निर्मिती करण्यात यावी, अशा अनेक मागण्यांसाठी मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनतर्फे १२ जून रोजी लाखो ऑटोरिक्षा चालक-मालकांचा वीर जिजामाता भोसले उद्यान ते मंत्रालय, असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये बेस्ट, महानगरपालिका आणि फेरीवालेही सहभागी होणार आहेत. येत्या १५ जून रोजी पिंपरी चिंचवड येथे ऑटोरिक्षा चालक-मालक यांचा राज्यव्यापी मेळावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारविरोधात १८ जूनपासून बेमुदत काळासाठी महाराष्ट्रव्यापी ऑटोरिक्षा बंद करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी दिली.

मागण्यांसाठी नागरिकांना वेठीस
ऑटो-टॅक्सी युनियन आपल्या अवाजवी मागण्या मान्य करून घेण्यासाठी पुन्हा एकदा नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार करत आहेत. रिक्षाचालकांची मुजोरी, भाडे नाकारण्याची सवय काही केल्या कमी होत नसताना आपल्याला शासनाचा कोणताही निर्णय मान्य नसल्याची भूमिका युनियनने घेतली आहे. युनियनच्या या मनमानीमुळे प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages