तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले

Share This
मुंबई : पंचवीस वर्षांच्या जियाने आत्महत्या केली आणि बॉलीवूडसह अवघा देश हळहळला. संपूर्ण भारत देशात तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून या आत्महत्यांमागचे नेमके कारण आणि या तरुणांचे समुपदेशन करण्याची वेळ जवळ आली आहे. प्रेमभंग, करिअरमधील अपयश, परीक्षेतील अपयश यासारख्या कारणांमुळे ज्या शक्तीमुळे भारत देश ओळखला जातो तीच तरुण शक्ती नाश पावत चालली आहे. तरुणांच्या आत्महत्यांमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर असून महाराष्ट्र दुसरा, तर दक्षिण भारत तिसर्‍या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती ज्येष्ठ समुपदेश डॉ. राजन भोसले यांनी बोलताना दिली.

अपेक्षांचे ओझे नकोअनेकदा पालक आपल्या पाल्यांकडून प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवतात आणि मग या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत किंवा तो पाल्य जर पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम नसेल तर मग तो पाल्य आत्महत्येचाच मार्ग स्वीकारतो. याउलट पालकांनी आपल्या पाल्याच्या क्षमतेप्रमाणे त्याच्याकडून अपेक्षा केल्या किंवा त्याला करिअरचे इतरही अनेक मार्ग आहेत याबाबत समजावून सांगितले. तसेच त्यांना अशा करिअरबद्दल माहीत नसेल तर एखाद्या करिअर समुपदेशकाकडून ते समजून घेतले आणि पाल्यालाही समजावून सांगितले तर तरुणांच्या तसेच अल्पवयीन विद्यार्थ्यांच्याही आत्महत्येचे प्रमाण अतिशय कमी होईल, असे डॉ. राजन भोसले यांनी सांगितले.बारावीचा निकाल लागला असून सीईटीचाही निकाल लागून गेला आहे. शुक्रवारी दहावीचा निकाल आहे. हा निकाल जसजसा जवळ येत जातो तसतशा विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या प्रसारित होऊ लागतात. अनेक विद्यार्थी आपल्या आईबाबांशी खोटे बोलतात आणि आपल्याला पेपर कसा गेला याबाबत सांगतच नाहीत. परीक्षेआधीचे दिवस त्यामुळे चांगले जातात. मात्र निकालाची वेळ जसजशी जवळ येऊ लागते, तसतसे त्यांच्यावरील तणाव वाढत जातो. परीक्षेत अपयश येणार किंवा आले या नैराश्यापोटी आत्महत्या करतात. या आत्महत्या टाळायच्या असतील तर विद्यार्थी आणि पालकांमध्ये समन्वय तसेच संवाद असायला हवा. पालकांनी आपल्या पाल्याला पेपर कसा गेला किंवा त्याने अभ्यास केला की नाही, याबाबतची माहिती असायला हवी. किंबहुना त्यांनी तसा संवाद आपल्या पाल्याबरोबर साधायला हवा. अशा प्रांजळ स्वीकारामुळे त्यांचा पाल्य तणावाखाली राहणार नाही आणि या आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल, असे मत डॉ. राजन भोसले यांनी मांडले.

संपूर्ण कुटुंबाचेच समुपदेशन करण्याची आता वेळ आली असल्याचे अतिशय महत्त्वपूर्ण मत डॉ. भोसले यांनी मांडले. कारण अनेकदा कुटुंबातच समन्वय किंवा संवाद नसतो. अपेक्षाभंग, प्रेमभंग, प्रेमप्रकरण,आईवडिलांशी न पटणे, मित्रांशी न पटणे, परीक्षेत अपयश अशा असंख्य कारणांमुळे तरुण नैराश्यात जातात आणि मग जिया खानच्या आत्महत्येसारख्या घटना घडतात. आपल्या सर्वच समस्यांबाबत पाल्यांनी पालकांशी बोलावे असे वाटत असेल तर आधी पालक आणि पाल्य यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असायला हवेत, त्यामुळे पाल्य पालकांशी आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टींची देवाणघेवाण करतो. त्यामुळे नैराश्यापोटी तरुणांकडून होणारे आत्महत्येसारखे गुन्हे टळतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages